Prasad lad : शिवसेना भवन फोडण्याआधी तुमचे थोबाड फोडू | पुढारी

Prasad lad : शिवसेना भवन फोडण्याआधी तुमचे थोबाड फोडू

मुबंई: पुढारी ऑनलाईन : भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad lad) यांनी शनिवारी शिवसेना भवन फोडण्याचे कथित वक्तव्य केल्यानंतर आता त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. Prasad lad यांच्या  शिवसेना भवन फोडण्याच्या वक्तव्यावर शिवसेना नेते राजन साळवी यांनी थोबाड फोडण्याचा इशारा दिला आहे.

‘शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांचे थोबाड फोडू,’ असं साळवी यांनी म्हटले आहेत.

तर ‘शिवसेना भवन’ला हात लावणं म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे पाय चेपण्याइतकं सोपं आहे, असं काही भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.’ अशी टीकाही साळवी यांनी केली आहे.

शिवसेना भवन फोडण्याची भाषा केल्यानंतर साळवी यांनी याबाबत खुलासा प्रसिद्ध केला असून ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे.माझे वाक्य मोडतोड करून प्रसिद्ध केले आहे.’ असे लाड म्हणाले.

आमदार प्रसाद लाड हे शिवसेनेच्या मतांवर विधानपरिषद निवडणूक जिंकले आहेत. लाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना साळवी म्हणाले, ‘शिवसेना भवन हे आम्हा शिवसैनिकांसाठी मंदिर आहे आणि यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींचा सुगंध आहे.

त्यांच्यावर शिवसेनेचे व शिवसेना भवनाचे उपकार आहेत. त्यांच्या तोंडी शिवसेना भवन फोडण्याची भाषा शोभत नाही.’

लाड यांना आव्हान देताना साळवी म्हणाले, ‘त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरं जाऊन दाखवावं.

आमचे शिवसैनिक तुम्हाला पराभवाच्या लाडूचा प्रसाद देतील.’

लाड यांचे वक्तव्य

भाजपच्या माहीम कार्यालयाबाहेर शनिवारी पक्षाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी लाड यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली.

राणे कुटुंबीयांना मानणारे कार्यकर्ते भाजपमध्ये आल्यामुळं भाजपची ताकद दुप्पट झाली आहे. त्यामुळे शिवसैनिक घाबरून गेले आहेत.

आम्ही नुसते माहीममध्ये आलो तरी शिवसेना भवन फोडायला आलो आहोत की काय असेच त्यांना वाटते. पण वेळ आली तर तेही करू.’

लाड यांचे घुमजाव

लाड यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटू लागल्यानंतर त्यांनी आता माघार घेत आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे.

त्यांनी रात्री उशिरा आपल्या फेसबुक अकाउंटवरून याविषयीचं स्पष्टीकरण दिलं आहे. ‘प्रसारमाध्यमांतून माझ्या एका भाषणाचा विपर्यास करून मी शिवसेना भवन फोडणार अशा बातम्या दिसत आहेत.

पण मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. जेव्हा आरे ला कारे होईल, तेव्हा कारेला आरेचं उत्तर दिलं जाईल.

पण ज्या शिवसेना प्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. शिवसेना प्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेना भवनाबद्दल माझ्याकडून तरी असं कोणतंही वक्तव्य केलं जाणार नाही.

जर मी कुणाचं मन दुखावलं असेल, तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.’

पहा व्हिडिओ: बाप्पांच्या आगमनाची तयारी

Back to top button