MARS : मंगळावरील ‘गाडलेली सरोवरे’ म्हणजे गोठलेला चिखलच? | पुढारी

MARS : मंगळावरील ‘गाडलेली सरोवरे’ म्हणजे गोठलेला चिखलच?

वॉशिंग्टन; पुढारी ऑनलाईन : MARS मंगळाच्या दक्षिण ध्रुवाखालून येणार्‍या रडारच्या चमकदार ‘रिफ्लेक्शन्स’नी संशोधकांमध्ये कुतुहल निर्माण केले होते.

हे ‘रिफ्लेक्शन’ तेथील गाडल्या गेलेल्या सरोवराचे संकेत देणारे असू शकतात असे त्यांना वाटले. मात्र, ही सरोवरे नसून तो ओलसर मातीचा केवळ साठा असू शकतो, असे नव्या संशोधनातून समोर आले आहे.

मंगळाच्या ध्रुवीय भागातील बर्फाच्या स्तराखाली पाणी असावे असे अनेक दशकांपासून संशोधकांना वाटत आले आहे. पृथ्वीवरही ध्रुवीय भागातील बर्फाखाली पाणी आहे. तसेच ते मंगळावरही असू शकते अशी धारणा होती.

2018 मध्ये याबाबतचे संशोधन करण्यासाठी संशोधकांनी ‘मार्सिस’ रडारचा वापर केला. हे रडार युरोपियन्स स्पेस एजन्सीच्या ‘मार्स एक्स्प्रेस’ यानावर आहे. या रडारच्या निरीक्षणावरून मंगळाच्या दक्षिण ध्रुवावर बर्फाच्या स्तराखाली छुपे सरोवर असल्याचे अनुमान काढण्यात आले.

2020 मध्ये अतिशय क्षारयुक्त म्हणजे खार्‍या पाण्याची ही सरोवरे तिथे असावीत अशी चिन्हेही शोधण्यात आली. एकेकाळी जर हे पाणी पृष्ठभागावर असेल तर ते तेथील जीवसृष्टीला कारणीभूत ठरले असावे असाही कयास लावण्यात आला.

मात्र, जर असे द्रवरूपातील पाणी मंगळाच्या या ध्रुवावर निर्माण होणे व टिकून राहणे यासाठी पुरेशी उष्णता आणि क्षाराची आवश्यकता आहे.

कॅनडातील टोरांटो येथील यॉर्क युनिव्हर्सिटीच्या इसाक स्मिथ व त्यांच्या सहकार्‍यांनी याबाबतचे संशोधन केले.

आता त्यांना आढळले की या ध्रुवावर ज्याला सरोवर समजले जात होते ते केवळ चिखलाचा किंवा मातीच्या खनिजांचा साठाच असू शकतो.

Back to top button