परभणी, पुढारी ऑनलाईन: परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर शनिवारी निवृत्त झाल्यानंतर आंचल गोयल यांच्याकडे कार्यभार सोपविण्याऐवजी तेथे जिल्हाधिकारी पदाची संगीत खुर्ची सुरू झाली आहे. परभणी च्या जिल्हाधिकारी म्हणून आंचल गोयल यांची नियुक्ती झाली असताना त्यांच्याकडे कार्यभारच देण्यात आला नाही.
अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे पदभार दिला आहे.
मुगळीकर हे सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली होती.
त्या कार्यभार स्वीकारण्यासाठी परभणी जिल्ह्यात दोन दिवस आधीच दाखल झाल्या होत्या. शनिवारी पालकमंत्री नवाब मलिक हे जिल्ह्यात होते.
त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमात त्या उपस्थित नव्हत्या. शनिवारी संध्याकाळी आंचल गोयल यांना राज्य सरकारने तातडीने परत मुंबईला बोलावले.
तसेच सामान्य प्रशासन विभागाने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे पदभार सोपवावा असे सुधारित आदेश काढले.
आंचल गोयल या डॅशिंग आणि कडक शिस्तीच्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात.
त्यामुळे त्यांनी कार्यभार घेण्याआधीच त्यांना हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
राजकीय नेत्यांच्या दबावापोटी सरकारने त्यांची परभणीतील नियुक्ती रद्द केली असल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सध्या रंगली आहे.
याबाबत गोयल यांच्याकडून मात्र अद्याप याबाबत स्पष्टीकरण आलेले नाही.
दरम्यान, मुंगळीकरांच्या निवृत्तीनंतर आता अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर हे परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
गोयल यांच्या जागी परभणी जिल्हाधिकारी म्हणून कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर हे आंचल गोयल यांच्याकडे पदाची सूत्रे सोपवणार आणि सेवानिवृत्त होणार हे निश्चित झाले होते.
तसा आदेशही काढण्यात आला होता. त्यानुसार तयारीही झाली होती. मात्र सामान्य प्रशासन विभागाचे सह सचिव अजित पाटील यांच्या स्वाक्षरीने गोयल यांच्याऐवजी काटकर यांच्याकडे कार्यभार देण्याचा आदेश आला.
'३० जुलैच्या आदेशामध्ये अंशत: बदल करण्यात येत असून आपण आपल्या पदाचा अतिरिक्त कार्यभार आंचल गोयल यांच्याऐवजी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवून सेवानिवृत्त व्हावे', असे आदेशात नमूद करण्यात आले होते.
त्यानुसार मुगळीकर यांनी काटकर यांच्याकडे कार्यभार सोपविला.