उचकी का लागते? जाणून घ्या रंजक माहिती | पुढारी

उचकी का लागते? जाणून घ्या रंजक माहिती

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : उचकी लागली की आपल्याला कुणीतरी आपली आठवण काढली असे वाटते. मात्र, खरोखरच उचक्या का लागतात अनेकांना ठाऊक असत नाही. सतत उचक्या येत असतील तर ही समस्याच बनते. यामुळे उचकीसंबंधी माहिती असणेही आवश्यकच आहे.

उचकी ही शरीरातील डायाफ्राम भागातून येण्यास सुरुवात होते. हे फुफ्फुस आणि पोटादरम्यानचे स्नायू असतात. ज्यावेळी आपण श्वास घेतो त्यावेळी डायाफ्राम खालील बाजूस खेचला जातो. श्वास सोडल्यानंतर तो पुन्हा पूर्वस्थितीत येतो.

डायफ्राम हे त्याचे कार्य एका विशिष्ट पद्धतीने करते. मात्र, एखादी समस्या जाणवते त्यावेळी त्यामध्ये बदल होतो. त्यामुळे हवा अचानक घशात थांबते व आवाज बाहेर पडण्यास समस्या येते.

‘व्होकल कॉर्ड’मध्ये या अचानक आलेल्या अडथळ्याने ‘हिच’ असा आवाज येतो. उचकी येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये काही शारीरिक आणि काही मानसिकही आहेत.

जास्त आणि खूप भरभर खाल्ल्यानेही उचकी येऊ शकते. तसेच अतिशय चिंताग्रस्त किंवा उत्साही असणे, कार्बोनेटेड पेय किंवा अधिक अल्कोहोलचे सेवन यामुळेही उचक्या लागतात.

तणाव, तापमानात अचानक बदल किंवा कँडी-च्युईंगम चघळताना तोंडात हवा भरल्यानेही उचकी येऊ शकते. सतत येणार्‍या उचक्यांमागे डायाफ्रामला जोडलेल्या नसांचे काही प्रमाणात झालेले नुकसान जबाबदार असू शकते.

कानाच्या तसेच घशाच्या समस्या डायाफ्रामच्या नसांवर परिणाम करतात. उचकी थांबवण्यासाठी पाणी पिणे वगैरे घरगुती उपाय केले जातात.

काही तज्ज्ञांच्या मते, काहीवेळ श्वास रोखून ठेवल्यानेही उचकी थांबते.

याशिवाय कागदी पिशवीत श्वास घेणे हा सुद्धा एक पर्याय आहे. यामुळे दोन्ही फुफ्फुसांमध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होऊन डायाफ्रामला आराम मिळतो.

जर दोन दिवसांपेक्षा अधिक काळ उचकी आणि खाणे-पिणे, श्वास घेणे तसेच झोपताना त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधणे हितावह असते.

Back to top button