सांगलीत निवृत्त शिक्षकावर हनिट्रॅप | पुढारी

सांगलीत निवृत्त शिक्षकावर हनिट्रॅप

मिरज ; पुढारी वृत्तसेवा : सांगलीतील एका निवृत्त शिक्षकाला हनिट्रॅप मध्ये अडकवून सात लाखांच्या खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी येथील गांधी चौक पोलिस ठाण्यात चिदानंद प्रकाश कुंभार (रा. येडूर, ता. चिकोडी, कर्नाटक) आणि उत्तम रघुनाथ सुतार (रा. कवठेमहांकाळ) या दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिकोडी (कर्नाटक) येथील एका महिलेने निवृत्त शिक्षक श्रीपाद पाटील (वय 65, रा. कलानगर, सांगली) यांच्याशी सोशल मीडियावर मैत्री केली. दोघांचे चॅटिंग सुरू झाल्यानंतर महिलेने पाटील यांना तिची छायाचित्रे पाठवली.

पाटील यांनीही स्वत:ची छायाचित्रे महिलेला पाठविली. त्यानंतर त्या ‘महिलेचा पती आहे’, असे सांगणार्‍या चिदानंद कुंभार याने पत्नीला आक्षेपार्ह फोटो पाठविल्याबद्दल विनयभंगाचा गुन्हा दाखल करून बदनामी करीन, अशी धमकी दिली आणि पाटील यांच्याकडे सात लाख रुपयांची मागणी केली.

मात्र पाटील यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्याविरुद्ध कर्नाटकात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

त्यानंतर पाटील यांनी कुंभार याला पाच हजार रुपये दिले. मात्र चिदानंद कुंभार व कवठेमहांकाळ येथील एका संघटनेचा पदाधिकारी उत्तम सुतार या दोघांनी पाटील यांच्या पत्नीला वारंवार फोन करून प्रकरण मिटविण्यासाठी मिरज बसस्थानकावर बोलावले. दोघांनी सात लाखांची मागणी करून ठार मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार श्रीपाद पाटील यांनी गांधी चौक पोलिसांत दिली आहे.

Back to top button