बेळगाव : खानापूर तालुक्यात पावसाने सर्व रेकॉर्ड तोडले | पुढारी

बेळगाव : खानापूर तालुक्यात पावसाने सर्व रेकॉर्ड तोडले

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : खानापूर तालुक्यातील मागच्या २४ तासात ५२१ मिलिमीटर म्हणजेच २० इंचहून अधिक पावसाची नोंद कणकुंबीत गावात झाली. दरम्यान खानापूर तालुक्यातील आमगाव येथील पर्जन्यमापक केंद्राचा संपर्क तुटला आहे. या भागात किती पावसाची नोंद झाली आहे याचा अंदाज येऊ शकला नाही.

कणकुंबी भागापेक्षा जास्त पाऊस आमगाव परिसरात सुरू असल्याने तेथे याहून अधिक पावसाची नोंद झाल्याचा अंदाज आहे.

खानापूर तालुक्यातील सर्व पूल पाण्याखाली

मलप्रभा, हलात्री, पांढरी या नद्यांना आलेल्या पुरामुळे खानापूर तालुक्यातील सर्व मार्गावरील सर्व पूल पाण्याखाली गेले आहेत.

बेळगाव गोवा महामार्गावरील जुना व नवीन दोन्ही पूल पाण्याखाली गेल्याने आज सकाळपासून वाहतूक बंद झाली आहे.

मारुतीनगर, दुर्गानगर येथील कुटुंबांना मंगल कार्यालयात हलवले

मलप्रभा नदी काठावर असलेल्या मारुती नगर वसाहतीत पाणी शिरले असून अनेक घरांना पाण्याचा वेढा पडला आहे.

कुंभार नाल्याला आलेल्या पुरामुळे दुर्गा नगर येथील आश्रय कॉलनीतील अनेक घरात पाणी शिरले आहे.

पुराचा फटका बसलेल्या अनेक कुटुंबांना स्टेशन रोडवरील नगरपंचायतीच्या मंगल कार्यालयात तसेच केएसआरपी रस्त्यावरील समुदाय भवनात स्थलांतरित करण्यात येत आहे.

हे ही वाचा : 

Back to top button