रत्नागिरी : ढगफुटी ने हाहाकार; खेडलाही पुराचा वेढा | पुढारी

रत्नागिरी : ढगफुटी ने हाहाकार; खेडलाही पुराचा वेढा

रत्नागिरी (पुढारी वृत्तसेवा) : चिपळूण, खेडमध्ये ढगफुटी सद‍ृश पावसाने महाप्रलय आला असून 2005 मध्ये आलेल्या पुरापेक्षाही महाभयंकर स्थिती निर्माण झाली आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी, शिवनदी, तर खेडमधील जगबुडी नदीला महाप्रलय आला आहे.

चिपळूण व खेडमध्ये पुणे येथील एनडीआरएफच्या दोन तुकड्या बचाव कार्य करीत असून स्थानिक आपत्ती व्यवस्थापन व ग्रामस्थ यांचे बचाव कार्य सुरू आहे. चिपळूणमध्ये सुमारे पाच हजारांहून अधिक नागरिक अडकून पडले आहेत

. शासकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. त्याचबरोबर संगमेश्‍वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर तालुक्यांत महापूर आला असून जिल्ह्यात करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. रत्नागिरीनजीकच्या टेंबे येथील एक महिला पुराच्या पाण्यात वाहून जाऊन तिचा मृत्यू झाला आहे.

पुराच्या पाण्यात अडकलेले नागरिक सुरक्षित बाहेर पडण्यासाठी टाहो फोडत होते. मात्र, भयानक पुरामुळे प्रशासन हतबल झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. या पुरामुळे व्यापार्‍यांसह नागरिकांचे कधी नव्हे ते कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या पुरामुळे चिपळूणवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या अनेक वर्षांत इतके पुराचे पाणी चिपळूण बाजारपेठेत भरले नव्हते.

गेल्या काही दिवसांपासून हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात रेड अ‍ॅलर्टचा इशारा दिला. तोपर्यंत पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली होती. दोन दिवसांपासून पाऊस जोरदार पडतच होता. परंतु, बुधवारी रात्री सोसाट्याच्या वार्‍यासह ढगफुटीसारखा पाऊस रात्रभर पडत होता.

त्यामुळे वाशिष्ठीसह शिवनदीच्या पातळीत हळूहळू मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मध्यरात्री पाणी भरण्यास सुरुवात झाली. त्यावेळी नागरिक झोपेत होते. मात्र, पुराचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर काही जागरुक नागरिक सुरक्षितस्थळी गेले.

काहींनी आपली वाहने सुरक्षित स्थळी हलवली. मात्र, काहींची वाहने तिथेच राहिल्याने पुराच्या पाण्यात सापडली. अनेक दुचाकी पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्या.

वाशिष्टी व शिवनदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने हळूहळू जुन्या बाजारपुलासह नवीन बाजारपुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. यामुळे चिपळूण बाजारपेठेशी पेठमाप, गोवळकोट रोड भागाचा संपर्क तुटला. याच कालावधीत पुराच्या पाण्याने चिपळूण बाजारपेठेला वेढा घातला. संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली. बाजारपेठेत किमान 10 फूट पाणी चढले होते. यामुळे दुकानातील मालाचे मोठे नुकसान झाले आहे.

धवल मार्टचा तळमजला पाण्याखाली गेल्याने आतील किराणा व अन्य मालाचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोना परिस्थितीमुळे व्यापार्‍यांचे कंबरडे मोडलेले असतांना आता पुरामुळे पूर्णतः मोडला आहे. यामुळे व्यापार्‍यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आता जगायचे कसे? असा प्रश्न व्यापार्‍यांसमोर पडला आहे.

चिपळूण बाजारपेठेसह, चिंचनाका, भोगाळे, विरेश्‍वर तलाव परिसर, मध्यवर्ती बस स्थानक, मुरादपुर, शंकरवाडी, मार्कंडी, अनंत आईस फॅक्ट्री परिसर, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, मेहता पेट्रोल पंप, साई मंदिर परिसर, परशुराम नगर, काविळतळी, वडार कॉलनी, राधाकृष्ण नगर असा एकंदरीत बहादुरशेखनाका परिसरापर्यंत पुराचे पाणी आले होते. चिपळूण रेल्वे स्टेशनकडे जाणार्‍या मुरादपूर रोडवर व परिसरात पाणी साचल्याने रेल्वेकडे जाण्याचा संपर्क तुटला. या भागातील नागरिक घरात अडकून पडले होते.

यापूर्वी बहादुरशेख नाका परिसरातच पाणी साचायचे. मात्र, यावेळी महामार्गावरील रेडीज पेट्रोल पंपात तीन फुटाचे पाणी साचले होते. डीबीजे महाविद्यालयासमोरील भागातही पुराचे पाणी प्रथमच साचले होते.अगदी शिवाजीनगर एसटी स्टॅण्डमध्ये पाणी आले होते.

दुसरीकडे चिपळूण नगर परिषदेपासून खेंड जाखमाता मंदिर परिसरापासून खेंड बावशेवाडी, कोलेखाजण रोड याचबरोबर कधी नव्हे ते देसाई बाजारपर्यंतच्या रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने चिपळूण-गुहागर मार्गाशी संपर्क तुटला. खेंड बावशेवाडी परिसरातील नागरिकांच्या घरात तर इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आले.

वाशिष्टी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने चिपळूण बाजारपुलावरून पाणी गेले अन पेठमाप, गोवळकोटरोड येथील सर्वच परिसरात पुराचे पाणीच पाणी झाले होते. या परिसरातील घरे, वाहने पाण्याखाली गेली.

गुरुवारी आलेल्या पुराची परिस्थिती भयानक होती. चिपळूण बाजारपेठ पाण्याखाली होतीच तर महामार्गापर्यंतच्या परिसरापर्यंत पाणी आले. यामुळे या ठिकाणच्या इमारतींखाली तसेच घरांमध्ये पाणी गेले. चिपळूण मध्यवर्ती बस स्थानक पुरामुळे पूर्णत: पाण्याखाली गेले होते. डेपोमध्ये उभ्या असणार्‍या बसेसचे फक्‍त टफ दिसत होते.

यामुळे येथील वाहने पॉवर हाऊस, महामार्ग परिसर तसेच शिवाजी नगर बस स्थानकात उभी करण्यात आली. खाजगी वाहनेदेखील महामार्गावर उभी करण्यात आली.

तर मुंबई अथवा रत्नागिरीच्या दिशेने जाणार्‍या वाहनांची मोठीच रांग लागली होती. या अतिवृष्टीमुळे चिपळूण – गुहागर बायपास मार्गावर दरड कोसळली. शिवाय पेढे येथे घरावर दरड कोसळल्याने चारजण जखमी झाले आहेत.

चिपळूण शहराला लागून असणार्‍या खेर्डीतदेखील पुराचे पाणी घुसले होते. खेर्डी माळेवाडी परिसर पाण्याखाली गेली होती. येथील नागरिक मदतीसाठी याचना करीत होते. खेर्डीत देखील इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी चढल होते. तर अनेक घरांची कौले दिसत होती. चिपळूण-कराड मार्ग त्यामुळे बंद ठेवण्यात आला होता.

चिपळूण व खेर्डीला जवळ असणारे व वाशिष्ठी नदीच्या दुसर्‍या किनार्‍यावर असणार्‍या कळंबस्ते गावातही पाणी घुसले होते. त्यामुळे खेड पंधरागावकडे जाणारा रस्ता बंद झाल्याने या गावांचा संपर्क तुटला होता. अतिवृष्टीमुळे चिपळूणतील धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.

चिपळूण शहर व परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. यामुळे पाणी पुरवठा योजनेवर परिणाम झाला. या परिस्थितीवर प्रशासकीय यंत्रणा लक्ष ठेवून होती. मात्र, अतिपुरामुळे प्रशासन हतबल झाले. आमदार शेखर निकम चिपळुणात तळ ठोकून होते.

वाहून आलेल्या सापांमुळे भीती

वाशिष्ठी व शीव नदीत मगरींचा अधिवास असून पुराच्या पाण्यामुळे या नद्यांमधील मगरी शहरात ठिकठिकाणी फिरताना दिसत आहेत. सापही मोठ्या प्रमाणात वाहून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आ. भास्कर जाधव यांचे दिशादर्शन

चिपळूणला मदत कार्यासाठी येणार्‍या जिल्हा प्रशासन व पोलीस पथकांना रस्त्यात अडचण येऊ नये म्हणून पाणी न भरणार्‍या मार्गांचे दिशादर्शन आमदार भास्कर जाधव यांनी केल्याने ही पथके वेळेत चिपळूणपर्यंत पोहोचली.

काजळी नदीला पूर

काजळी नदीला आलेल्या पुराचा फटका चांदेराई, हातीस, टेंबेपूल या भागाला बसला. चांदेराई पूल व बाजारपेठेत चार ते पाच फुटांपेक्षा अधिक पाणी होते. हातीस गावामध्येही पाणी भरल्याने पीर बाबरशेख दर्ग्यात पाणी घुसले होते. टेंबे पूल, सोमेश्‍वर येथील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

कोरोना रुग्ण अडकले पुरात

शिवनदीच्या किनार्‍याजवळ खेडेकर क्रीडा संकुलात कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. याठिकाणी 20हून अधिक रुग्ण उपचार घेत होते. मात्र, बुधवारी मध्यरात्रीनंतर या भागात पाणी भरल्याने रुग्ण अडकून पडले होते. काही दिवसांपूर्वीच हे कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले होते.

प. महाराष्ट्राशी संपर्क तुटला

गुहागर-विजापूर, मिर्‍या-नागपूर व पाचल-कोल्हापूर या मार्गांवर पुराचे पाणी आल्याने हे महामार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्राशी जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे. आंबा घाटातही रस्ता खचला आहे. त्याचबरोबर चिपळूण व खारेपाटण येथे पुराचे पाणी भरल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

Back to top button