कोल्हापूर जिल्ह्यातील या मार्गांवरील वाहतूक पूर्णत: बंद | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यातील या मार्गांवरील वाहतूक पूर्णत: बंद

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यातील 8 प्रमुख व 28 जिल्हा मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद झाली आहे. याचबरोबर १११ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. संततधार पावसामुळे कोल्हापूरला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. राजाराम बंधार्‍यावरील पाणी पातळी सकाळी ७ वाजता ४६.०७ फुटांवर गेल्याने पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरम्यान खेड्यातील गावांमधील ओढ्या नाल्याना पाणी आल्याने वाहतुक पूर्णत: बंद करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी दिवसभर अनेक ठिकाणी ढगफुटी झाल्याने 24 तासांत 202 मिलिमीटर पाऊस कोसळला.

महापुराच्या भीतीने जिल्ह्यातील शाहूवाडी, करवीर, पन्हाळा तालुक्यांतील 996 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.

दूधगंगा, वारणा, हिरण्यकेशी, घटप्रभा, वेदगंगा या नद्या सायंकाळी 6 पर्यंत इशारा पातळीपर्यंत पोहोचल्या होत्या.

दरम्यान, रात्री उशिरा बावडा-शिये रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

वेधशाळेने 22 व 23 रोजी ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ जारी केला आहे.

गुरुवारी दुपारी पुण्याहून ‘एनडीआरएफ’च्या दोन तुकड्या कोल्हापुरात दाखल झाल्या. यातील एक तुकडी शिरोळला, तर दुसरी तुकडी करवीर तालुक्यात रवाना करण्यात आली आहे.

पाऊस असाच कोसळत राहिल्यास शुक्रवारी कोल्हापूरला महापुराची भीती आहे.

पंचगंगा नदीचे पाणी जामदार क्लबजवळ आले असून, कुंभार गल्ली, मंगळवार पेठेतील रेणुका मंदिर, न्यू पॅलेस, रामानंदनगर, अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटल परिसरात पाणी आल्यामुळे कोल्हापूर शहरातील जनजीवन विस्कळीत झाले.

दरम्यान, राधानगरी धरणातून 1,425 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

या मार्गांवरील वाहतूक पूर्णत: बंद

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर पाणी; वाहतूक पूर्णत: बंद
कसबा बावडा-शिये रस्ता बंद
मलकापूर ते रत्नागिरी मार्गावर येल्लूरजवळ पाणी
बर्कीजवळ पुलावर पाणी; संपर्क तुटला
मालेवाडी-सोंडोली येथील पूल वाहतुकीस बंद
उखळू, खेडे, सोंडोलीकडे जाणार्‍या रस्त्यावर पाणी
कडवी पुलावर पाणी; मलकापूर ते शिरगाव मार्ग बंद
करंजफेण, माळापुढे, पेंढाखळे वाहतूक थांबवली
करुंगळे ते निळे व कडवे ते निळे मार्ग बंद
निलजी, ऐनापूर बंधार्‍यावर पाणी; वाहतूक बंद
मालेवाडी ते सोंडोली रस्त्यावर पाणी
गगनबावडा मार्गावर किरवे येथे पाणी; वाहतूक बंद
कसबा बीड-महेदरम्यानचा पूल पाण्याखाली
गारगोटी-गडहिंग्लज रस्ता वाहतुकीसाठी बंद
मुरगूड ते कुरणी हा बंधरा पाण्याखाली,
निढोरीमार्गे कागल या रस्त्यावरून वाहतूक सुरू
सुरुपली ते मळगे बंधारा पाण्याखाली
सोनगे ते बानगे मार्गावरून वाहतूक सुरू
बस्तवडे ते आणूर बंधार्‍यावर पाणी
पर्यायी सोनगे, बानगेमार्गे वाहतूक सुरू
कोवाडे, नांगनूर, निलजी, ऐनापूर या बंधार्‍यांवर पाणी
महे ते बीड मार्गावर पाणी; वाहतूक बंद

जिल्ह्याच्या धरणांतील पाणीसाठा असा…

तुळशी 67.21 द.ल.घ.मी. (68 टक्के), वारणा 838.32 द.ल.घ.मी.(86 टक्के), दूधगंगा 430.43 द.ल.घ.मी. (60 टक्?के), कासारी 61.71 द.ल.घ.मी. (79 टक्के), कडवी 59.59 द.ल.घ.मी. (84 टक्के), कुंभी 63.95 द.ल.घ.मी. (83 टक्के), पाटगाव 81.42 द.ल.घ.मी. (77 टक्के).

ओढ्यातून एक वाहून गेला; दोघांना वाचविण्यात यश

चंदगड तालुक्यात घुल्लेवाडीमार्गे तळगोळीकडे जाताना घुल्लेवाडी व निट्टूरदरम्यानचा ओढा ओलांडताना तिघेजण वाहून गेले.
यामध्ये तळगोळीच्या सुनीता पांडुरंग कंग्राळकर (वय 38) यांचा शोध लागला नाही.
तर सौरभ पांडुरंग कंग्राळकर व यलुबाई तुकाराम कंग्राळकर यांना वाचविण्यात यश आले.

तालुकानिहाय पाऊस (मि.मी.मध्ये)

जिल्ह्यात गुरुवारी सकाळी 8.30 ते सायंकाळी 6 पर्यंत पडलेला तालुकानिहाय पाऊस असा : आजरा 76.06, भुदरगड 71.85, चंदगड 66.13, गडहिंग्लज 45.18, गगनबावडा 50.5, हातकणंगले 14.81, कागल 60.79, करवीर 62.16, पन्?हाळा 49.93, राधानगरी 101.58, शाहूवाडी 93.42, शिरोळ 4.14.

महालक्ष्मी, कोयना एक्स्प्रेस रद्द

कोल्हापूर : राज्यात सुरू असणार्‍या मुसळधार पावसाने वाहतूक व्यवस्था बिघडली असून, कोल्हापुरातून सुटणार्‍या महालक्ष्मी आणि कोयना एक्स्प्रेस या दोन्ही रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या आहेत. लोणावळा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने अनेक रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहेत. त्याचा फटका कोल्हापूरलाही बसला. सकाळी मुंबईस जाणारी कोयना एक्स्प्रेस आणि रात्री सुटणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या गुरुवारी रद्द केल्या. दरम्यान, रेल्वेच्या वरिष्ठ प्रशासनाच्या सूचनेनुसार शुक्रवारी सुटणार्‍या गाड्यांबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

सावर्डे मळीचा धनगरवाडा (ता. शाहूवाडी) येथे भूस्खलन 2 जनावरे दगावली

उत्तूरजवळ पोल्ट्री फार्ममध्ये ओढ्याचे पाणी; 4 हजार कोंबड्या वाहून गेल्या

कोल्हापूर शहरात 5 ठिकाणी ओढ्याचे पाणी घरांमध्ये घुसले; नागरिकांची त्रेधातिरपीट

विमानसेवेलाही पावसाचा बसला फटका

उजळाईवाडी : मुसळधार पावसामुळे गुरुवारी कोल्हापूरच्या विमानसेवेला फटका बसला. इंडिगोचे हैदराबाद विमान आले. पण हवेत घिरट्या घालून लँडिंग न होता बेळगावला परतले. त्याचा फटका प्रवाशांना बसला. गुरुवारी जोरदार पाऊस झाला. पण तरीही सकाळी 1 तास उशिरा का असेना, इंडिगो अहमदाबाद विमान आले.

प्रवासी घेऊन अहमदाबादला गेले. दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने खराब हवामानामुळे विमान टेक ऑफ व लँडिंग करणे सोयीचे नसल्याने इंडिगोचे हैदराबाद विमान दुपारी तीनच्या सुमारास आले. पण हवेत घिरट्या घालून लँडिंग न होताच बेळगावला परतले.

शिवाजी पूल, रंकाळा, कळंबा परिसरात बंदोबस्त

मुसळधार पाऊस आणि नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागल्याने नदीकाठासह रंकाळा व कळंबा तलाव परिसरात गुरुवारी सायंकाळनंतर नागरिकांची गर्दी झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून शिवाजी पूल, रंकाळा व कळंबा तलाव परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हुल्लडबाजांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.

ओढ्यातून तिघे वाहून गेले; दोघांना वाचविण्यात यश

चंदगड : पुढारी वृत्तसेवा

घुल्लेवाडी मार्गे तळगोळीकडे जाताना घुल्लेवाडी व निट्टूर दरम्यानचा ओढा ओलांडताना तिघेजण वाहून गेले. मात्र तळगोळीच्या महिलेचा मृत्यू झाला तर दोघांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. ओढ्याच्या पुरातून सुनीता पांडूरंग कंग्राळकर (वय 38, रा. तळगोळी) वाहून गेल्या. तर सौरभ पांडुरंग कंग्राळकर (19) व यलूबाई तुकाराम कंग्राळकर हे दोघे बचावले.

नानीबाई चिखलीचा संपर्क तुटला

नानीबाई चिखली बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कुरलीकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. कौलगे रस्त्यावर पाणी असल्यामुळे कौलगेकडेही जाणे बंद झाले आहे. खडकेवाडानजीक पाणी आल्यामुळे खडकेवाडा फाट्यावरही जाता येत नाही. तर निपाणीकडे जाण्यासाठी कोडणी पुलावर पाणी आले असल्यामुळे चिखलीकरांची कोंडी झाली आहे. तसेच वेदगंगा नदीचे पाणी बाहेर पडल्यामुळे चावडी गल्ली व शुक्रवार पेठेतील नागरिकांचे स्थलांतर कुमार शाळेमध्ये केले जात आहे.

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत रात्रीतून झपाट्याने वाढ झाल्याने येथील बस डेपोच्या 47 बसेस व साहित्य दत्त कारखाना येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.गोठणपूर परिसरात पाणी पसरल्याने कोरवी बांगडी गल्लीतील 35 कुटुंबे स्थलांतरीत झाले आहेत.

दरम्यान मुख्याधिकारी निखिल जाधव,नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी पाहणी करून पूर परिसरस्थिती नुसार स्थलांतरित व्हावे असे आवाहन केले आहे.

हेरवाड-अब्दुललाट रस्त्यावरील सुतार ओढ्यात पाणी आल्याने अब्दुललाट व ईचलकरंजीकडे जाणार मार्ग बंद झाल्याने पाच मैल लाटवाडी मार्गाचा अवलंब करत आहेत.शिकलगार वाडा परिसरात अद्यापही पाणी आलेले नाही त्यामुळे बस्तवाड मार्ग सध्या सुरू आहे.

मजरेवाडी रस्ता खुला आहे.हेरवाड कुरुंदवाड रस्ता उंच झाल्याने हा रस्ता ही खुला आहे.अनवडी नदी बंधारा पाण्याखाली गेल्याने शिरोळला जाणारा मध्यमार्ग बंद झाला आहे.

पंचगंगा नदीपात्रातून निर्माण करण्यात आलेल्या अनवडी नदीचे पाणी गुरुवारी रात्रीतून वाढल्याने गोठणपूर परिसरात

३० कुटुंबे स्थलांतरीत

पसरल्याने करमरे दड्डी पाठीमागे पाणी आल्याने दस्तगिर बारगिर,मनोज शिंदे, तानाजी आलासे, दिगंबर गोंधळी, गणपती गोंधळी, संजय कोळी, सुभाष कोरवी, आण्णापा कोरवी, दिलीप हातळगे, अनिल शिंदे सह आदी 30 हुन अधिक कुटुंबांचे व जनावरच्या गोठ्यात पाणी शिरल्याने जनावरासह नागरिक स्वतःहून अन्यत्र स्थलांतरित झाले आहेत.

ओढा परिसरात शिकलगार वस्ती पर्यंत पाणी आले आहे.बस स्थानकाच्या समोर पाणी आल्याने बस डेपो व्यवस्थापकांनी 47 बसेस व साहित्य दत्त कारखाना शिरोळ येथे स्थलांतरित केले आहे.

पंचगंगा नदीची पाणीपातळी धोका पातळीची सीमा ओलांडत असल्याने शिरोळ

तालुका आपत्ती व्यवस्थापन,कुरुंदवाड नगरपरिषद,अग्निशामक विभाग व पोलीस

ठाण्याच्यावतीने यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.गोठणपूर परिसरामध्ये शशिकांत

कडाळे,नितीन संकपाळ शशिकांत हातळगे,रिजवान मतवाल, अजित दीपंकर, निशिकांत ढाले सह अदिचे आपत्ती व्यवस्थापन पथक परिसरात फिरून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्यासाठी आवाहन करत आहेत.

हे ही वाचा :

हे ही पाहा

Back to top button