बेळगाव : पाऊस संततधार, जनजीवन थंडगार | पुढारी

बेळगाव : पाऊस संततधार, जनजीवन थंडगार

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधारेमुळे संपूर्ण जिल्ह्यातील सखल भाग जलमय झाला. पुणे-बंगळूर महामार्गावर काकती, सुतगट्टीनजीक पावसाचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. खडेबाजार आणि कंग्राळ गल्ली येथे घरे कोसळली. सुदैवाने दोन्ही घटनांत जीवितहानी झाली नाही. ठिकठिकाणी झाडे कोसळली आहेत.

मार्कंडेय नदीचे पाणी पात्राबाहेर गेल्याने काकती महामार्गावर पाणी आले आहे. या प्रवाहातून कार वाहत जाऊन खड्ड्यात जाऊन अडकली.

गुरुवारी दिवसभरात बेळगाव शहर व ग्रामीण भागात सुमारे वीस झाडे कोसळली. यामुळे शहर व उपनगरात काही भागांत वीज खंडित झाली होती.

बेळगाव मध्ये रात्रंदिवस कोसळत असलेल्या पावसामुळे परिसरातील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. पावसामुळे सखल भागात पाणीच पाणी झाले आहे.

मुसळधार पावसामुळे सरदार ग्राऊंडजवळील कंग्राळी गल्ली येथील नागेश निर्मळकर यांच्या मालकीच्या कौलारू घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले. घरामध्ये सार्वजनिक मंडळाच्या डॉल्बीचे साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू व घरगुती साहित्याचे सुमारे 3 लाखांचे नुकसान झाले.

खडेबाजारमध्ये जुने घर कोसळले आहे. या घरात कुणीही राहत नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. भारत वॉच दुकानाच्या घराशेजारील व्यक्‍तींनी घर कोसळताना व्हिडीओ काढला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

गुरुवारी मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार उडवून दिला. ग्रामीण भागात बुधवारी रात्री उशिरा पावसाचा जोर वाढल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहण्यास सुरुवात झाली. मार्कंडेय नदीची पातळी वाढली आहे.

अथणी आणि कागवाड भागातील नदीकाठच्या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. जिल्हाधिकारी पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी फूटभर पाणी आले असून वाहने सावकाश हाकण्यात येत आहेत. काकतीनजीक पाण्याच्या प्रवाहामुळे बेळगावहून संकेश्वरकडे जाणारी कार रस्त्या च्याकडेला जाऊन थांबली. पाण्याच्या प्रवाहामुळे कार महामार्गावरून थेट खोलगट भागात गेली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सकाळपासून संथ झाली होती.

पाऊस
काकती : महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने प्रवाहाने वाहत जाऊन अडकलेली कार.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाऊस कमी होता.त्यामुळे धरणात वेगाने पाणीसाठा वाढला नाही. याच काळात पूर्व भागात अधूनमधून चांगला पाऊस होत गेला. त्यामुळे खरीप हंगामातील पिके चांगली आली.

जून महिन्याच्या शेवटी पावसाने ओढ दिली असली तरी, जुलै महिना 15 तारिख झाल्यानंतर दमदार पाऊस पडत आहे. यामुळे जलाशयात वेगाने पाणीसाठा वाढत चालला आहे.

शहरात बुधवारी रात्री पासून ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडण्यास सुरुवात झाली आहे. टिळकवाडी येथे शांतीनगरात सागर भासले यांच्या घरावर वृक्ष उन्मळून पडला.

सुदैवाने या घटनेत जीवीहानी झाली नाही. मात्र सरंक्षण भिंत व घराचे थोडे नुकसान झाले. कचेरी रोड येथे देखील गायत्री हॉटेलच्या बाजूला असलेला गुलमोहर आडवा झाला.

त्याबरोबर व्हॅक्सीन डेपोजवळ झाड उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. याची माहिती मिळतात वनखात्याने लागलीच झाडांच्या फांद्या कापून रहदारीला मार्ग मोकळा केला.

खानापुरात नदीकाठावरील शिवारे जलमय

संततधार पावसामुळे नदी-नाल्यांच्या काठावरील शिवारे पाण्याखाली गेली आहेत. मलप्रभा, हलात्री, पांढरी या नद्यांच्या काठावरील शिवारर जलमय झाला असून शेती कामेही ठप्प झाली आहेत. बांध फुटलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Back to top button