औरंगाबाद : ‘बॉयफ्रेंड’वरून तीन विद्यार्थिनींमध्ये फ्रिस्टाइल हाणामारी | पुढारी

औरंगाबाद : 'बॉयफ्रेंड'वरून तीन विद्यार्थिनींमध्ये फ्रिस्टाइल हाणामारी

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : ‘बॉयफ्रेंड’वरून एका महाविद्यालयातील तीन विद्यार्थिनींमध्ये जोरदार हाणामारी झाली. दोघींनी एका तरुणीला अगदी डोक्याचे केस धरून आणि बेल्टने मारहाण केली. शनिवारी दुपारी झालेल्या वादाचा व्हिडिओ सोमवारी (दि. २८) व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला. एकीकडे महिलांविषय गुन्हे वाढल्याने पोलिस महाविद्यालयीन तरुणींना स्वसंरक्षणाचे धडे देत असताना दुसरीकडे कॉलेजच्या विद्यार्थिनी बॉयफ्रेंडवरून भिडल्याचे समोर आल्याने जोरदार चर्चा सुरु आहे.

औरंगाबाद येथे एका महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये तीन मुलींची हाणामारी झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. दोघींनी एकीला पकडून बेल्ट, लाथाबुक्यांसह तुफान मारहाण केली. एकटी असलेल्या तरुणीनेही त्यांचा जोरदार प्रतिकार केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. कॉलेजमधील पुरुष आणि सुरक्षा रक्षक पटकन भांडण सोडविण्यासाठी गेले. मात्र, त्यांनाही तरुणींनी दाद दिली नाही.

नागरिकांनी अगदी हाताला धरून त्यांना वेगवेगळे करण्याचा प्रयत्न केला मात्र, तरीही तरुणी एकमेकींच्या अंगावर धावून जात होत्या. हातात बॅडमिंट खेळण्याची रॅकेट असलेल्या एका तरुणाने त्यांना भांडण करण्यापासून रोखले आणि हा वाद थांबला. दरम्यान, महिला सुरक्षारक्षक आल्यावर त्या एका तरुणीला घेऊन बाजुला गेल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button