नगर: विद्युत रोहित्र बंद करून पठाणी वसुली! नियमित बिल भरणार्‍या शेतकर्‍यांनाही फटका; महावितरणचा अनागोंदी कारभार | पुढारी

नगर: विद्युत रोहित्र बंद करून पठाणी वसुली! नियमित बिल भरणार्‍या शेतकर्‍यांनाही फटका; महावितरणचा अनागोंदी कारभार

नगर तालुका, पुढारी वृत्तसेवा: नगर तालुक्यात महावितरण कंपनीने वीजबिल वसुलीसाठी सरसकट रोहित्र बंद करण्याचा धडाका लावला आहे. मात्र, त्यांच्या या अनागोंदी कारभाराचा फटका नियमित बिल भरणार्‍या शेतकर्‍यांनाही बसत आहे. ज्यांच्याकडे थकबाकी आहे, त्यांचे वैयक्तिक कनेक्शन कट करून वसुली केली गेली पाहिजे. मात्र, वर्षभर कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने महावितरण कंपनीही अर्थिक अडचणीत येत आहे.

यावर्षी शेतकर्‍यांच्या खरीप पिकांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. महावितरण कंपनीही वसुलीअभावी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेली आहे. अशा परिस्थितीत पठाणी वसुली करणे कितपत योग्य? हा संशोधनाचा विषय आहे. महावितरण कंपनीची मोठी थकबाकी आहे, ही वास्तविकता आहे. परंतु, कंपनीचे अधिकारी, कर्मचारी वर्षभर काय काम करतात? शेतकर्‍यांच्या पिकांना पाण्याची गरज असताना रोहित्र बंद करून वसुलीचा पायंडाच पडत चालला आहे. मात्र, रोहित्र बंद केल्याने नियमितपणे वीज बिल भरणार्‍या शेतकर्‍यांचाही वीज पुरवठा खंडित होऊन त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय होत आहे. सद्यस्थितीत कांदा, गहू पिकांना पाणी देण्याची गरज असताना रोहित्र बंद करण्यात येत असल्याने शेतकरी वर्गामध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

महावितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी रोहित्र बंद करण्याऐवजी वर्षभर वसुलीसाठी प्रयत्न केले तर ही वेळच येणार नाही. त्यामुळे नियमित वीज बिल भरणा करणार्‍यांवरही अन्याय होणार नाही. महावितरणने शेतकर्‍यांना वेठीस न धरता वसुली करावी व शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकर्‍यांमधून होत आहे.

Back to top button