राज ठाकरेंनी राज्यपालांच्या विरोधात ‘खळ्ळ खट्याक करावे : मनीषा कायंदे यांचे आव्हान | पुढारी

राज ठाकरेंनी राज्यपालांच्या विरोधात ‘खळ्ळ खट्याक करावे : मनीषा कायंदे यांचे आव्हान

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : चोराच्या उलट्या बोंबा… सौ चुहे खाँके बिल्ली चली हज को… स्वतःचे ठेवायचे झाकून… आयत्या पिटावर रेघोट्या… तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो… या सगळ्या म्हणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणाला तंतोतंत लागू पडतात. सतत कोलांटउड्या मारत नवनवीन भूमिका बदलून सुद्धा राज ठाकरे यांच्या मनसेला यश मिळत नाही. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. आपले अपयश दुसऱ्याच्या माथी मारण्यासाठी ते काहीही बरळत सुटले आहेत, अशा शब्दांत शिवसेनेच्या आमदार प्रा. मनीषा कायंदे यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

प्रा. मनीषा कायंदे यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यात त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचा समाचार घेतला आहे. सध्या महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा आगडोंब उसळला आहे. भाजपधार्जिणे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांचा दुसऱ्यांदा अपमान केला आहे. महाराष्ट्राविषय़ी वाईट बोलायचे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वादग्रस्त विधाने करायची, अशी मोहिमच भाजपधार्जिण्या कोश्यारी यांनी हाती घेतली आहे.

परंतु राज्यपालांविरोधात आंदोलनाविषयी ब्र शब्द सुद्धा काढण्याची तसदी राज ठाकरे यांनी घेतली नाही. भाजपचे नेते नाराज होणार नाहीत, अशा पद्धतीने हातचे राखून त्यांनी भाषण केले. जास्त बोलल्यानंतर ईडी पुन्हा मागेल, अशी त्यांना भाषण करताना सतत भीती वाटत असावी, असे त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून दिसत होते.

कोश्यारी यांच्याविरोधात शिवसेनेने आंदोलन पुकारले. तर खरोखरच महाराष्ट्र बंद होईल, या कल्पनेनेच राज ठाकरे यांची गाळण उडाली आहे. त्यामुळे मनसेच्या आंदोलनाचा इतिहास सांगण्याची केविलवाणी धडपड राज यांनी भाषणातून केली. मनसेचे समोर आंदोलन करायची, अन् माघारी चर्चा करायची, हे जनतेच्या पक्के ध्यानात आले आहे. लोकांनी मनसेच्या अशा आंदोलनाविषयी आपली स्मृती शाबूत ठेवल्यामुळेच राज ठाकरेंच्या मनसेला सतत पराभव चाखावा लागल्याची आठवण प्रा. कायंदे यांनी करून दिली.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीररित्या राज ठाकरे यांना कानपिचक्या दिल्या होत्या. माझे नाव वापरायचे नाही, अशी ताकीद बाळासाहेबांनी दिली होती. पण बाळासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय आपले दुकान चालणार नाही, हे राज ठाकरे यांना ठाऊक आहे. त्यामुळेच त्यांनी भाषणात बाळासाहेबांचे नाव घेण्याचा हावरटपणा केला. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्या आजाराची नक्कल करून दाखविली. हे फारच संतापजनक होते. शिवसेना तसेच उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्याविषयी जनतेमध्ये प्रचंड सहानुभूतीची लाट आहे. या पुढील निवडणुकांमध्ये गद्दार व भाजपचा पराभव होणार आहे. या गद्दारांच्या वळचणीला गेलो, तर आपल्याही दोन – चार जागा निवडून येतील, असे स्वप्न राज ठाकरे यांना पडले आहे.

सततच्या अपयशाने खचलेल्या राज ठाकरे यांना आता गद्दारांचा आधार वाटू लागला आहे. म्हणून भाजपच्या सांगण्यावरून खोके सरकारसाठी त्यांनी कालची सभा प्रायोजित केली होती, अशा तीक्ष्ण शब्दांत प्रा. कायंदे यांनी राज ठाकरे यांच्यावर आसूड ओढला आहे. राज ठाकरे यांच्या भाषणाला वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांतून टीचभर जागा मिळाली आहे. यावरूनच राज ठाकरे यांचा जनमाणसांतील ‘टीआरपी’ घसरल्याचे दिसत आहे. एक उत्तम नकलाकर म्हणून जनतेचे मनोरंजन व्हावे या प्रामाणिक हेतूने पत्रकार बांधवांनी राज ठाकरे यांची बोळवण केलेली दिसत आहे, असेही प्रा. कायंदे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button