FIFA World Cup : कॅमेरूनचे झुंझार कमबॅक, सर्बियाला 3-3 गोल बरोबरीत रोखले | पुढारी

FIFA World Cup : कॅमेरूनचे झुंझार कमबॅक, सर्बियाला 3-3 गोल बरोबरीत रोखले

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिफा विश्वचषक स्पर्धेत आज (दि. 28) कॅमेरून आणि सर्बिया यांच्यातील सामना 3-3 असा बरोबरीत सुटला. कॅमेरूनने सामन्यातील पहिला गोल करून 1-0 अशी आघाडी घेतली, परंतु पहिल्या हाफच्या शेवटी सर्बियाने दोन मिनिटांच्या अंतराने दोन गोल करून 2-1 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच सर्बियाने आणखी एक गोल केला आणि 3-1 अशी आघाडी घेतली. यानंतर कॅमेरूनने 64व्या आणि 66व्या मिनिटाला गोल करत 3-3 अशी बरोबरी साधली. यानंतर सामन्यात एकही गोल होऊ शकला नाही आणि सामना बरोबरीत सुटला.

या सामन्यात सर्बियाकडून स्ट्राहिंजा पावलोविक, सर्गेज मिलिन्कोविक आणि अलेक्झांडर मिट्रोविक यांनी गोल केले. त्याचवेळी कॅमेरूनकडून जॅन चार्ल्स, व्हिन्सेंट अबोबेकर आणि एरिक मॅक्सिम यांनी गोल केले. आता दोन्ही संघांचे दोन सामन्यांनंतर एक गुण झाले असून दोन्ही संघ विश्वचषकातून बाहेर होण्याच्या मार्गावर आहेत. या गटातून ब्राझील आणि स्वित्झर्लंडचे संघ पुढील फेरी गाठण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत.

कॅमेरून विरुद्ध सर्बिया हा सामना चुरशीने खेळला गेला. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी चेंडूवर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करून प्रसिस्पर्धी संघावर आक्रमण केले. पहिल्या 25 मिनिटांत एकही गोल झाला नाही. यादरम्यान सर्बियाला गोल करण्याच्या तीन संधी मिळाल्या पण त्यांना यात यश आले नाही. दरम्यान, मिट्रोविकने गोल करण्याची सोपी संधी गमावली आहे. सामन्याच्या 17व्या मिनिटाला त्याला गोल करण्याची उत्तम संधी होती, मात्र त्याने गोलपोस्टच्या बाहेर शॉट मारला आणि गोल करू शकला नाही. या दरम्यान मॅच रेफरीने कॅमेरूनच्या एन कौलूला पिवळे कार्ड दाखवून ताकीद दिली आहे. तो धोकादायकरित्या खेळत होता आणि त्याच्यामुळे सर्बियन खेळाडूला दुखापत झाली. यानंतर रेफरींनी त्याला पिवळे कार्ड दिले.

1 गोलच्या पिछाडीवरून सर्बियाचे झटपट दोन गोल…

सामन्याच्या 29व्या मिनिटाला जीन-चार्ल्स कॅस्टेलेटोने अप्रतिम गोल करत कॅमेरून संघासाठी 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे सर्बिया पिछाडीवर पडला. या गोलसाठी एन कौलूने त्याला साथ दिली. पहिल्या हाफची हाफची 45 मिनिटांची निर्धारीत वेळ पूर्ण होईपर्यंत कॅमरूनने एक गोलची आघाडी काय ठेवली, पण त्यानंतर मिळालेल्या इंज्यूरी टाईममध्ये (45+1) सर्बियाने बरोबरी साधली. स्ट्रहिंजा पावलोविकने उत्कृष्ट गोल करत सर्बियाचे सामन्यात पुनरागमन केले. त्याने ताडिकच्या शानदार पासचे गोलमध्ये रूपांतर केले. त्यानंतर पुढच्याच दोन मिनिटांत आणखी एक गोल डागून 2-1 ची आघाडी मिळवली. सर्बियासाठी सर्गेज मिलिन्कोविकने दुसरा गोल केला. जिव्हकोविचने त्याला या गोलमध्ये मदत केली. खेळाचा पहिला हाफ संपला. यावेळी सर्बियाकडे सध्या 2-1 अशी आघाडी होती. यानंतर सर्बियाने दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाही एक गोल केला. अलेक्झांडर मिट्रोविकने सर्बियासाठी तिसरा गोल केला. त्याने सामन्याच्या 57व्या मिनिटाला जिव्हकोविचच्या पासवर उत्कृष्ट गोल करत आपल्या संघाला 3-1 ची आघाडी मिळवून दिली.

कॅमरूनने गोल फरक कमी केला…

कॅमेरूनने सामन्याच्या 64व्या मिनिटाला दुसरा गोल करून गोल फरक कमी केला. कॅमेरूनसाठी अबोबेकरने आपल्या संघाला सुरेख गोल करून पुनरागमनाची संधी मिळवून दिली. त्याला योग्य वेळी कॅस्टेलेटोने पास दिला. या संधीचे सोने करत त्याने गोलजाळे भेदले.

कॅमेरूनचा दोन मिनिटांत दुसरा गोल

कॅमेरूनने दोन मिनिटांत दोन गोल करून गोल स्कोअर 3-3 असा बरोबरीत आणला. चौपो मोटिंगने सामन्याच्या 66व्या मिनिटाला कॅमेरूनसाठी तिसरा गोल केला. त्याने ओबोबकरच्या उत्कृष्ट पासचे गोलमध्ये रूपांतर केले. सामन्यात बरोबरी साधल्यानंतर कॅमेरून संघाने दोन बदल केले आणि वेगळ्या रणनीतीने खेळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सर्बियाचे आक्रमण रोखले. अखेर त्यांना हा सामना बरोबरीत ठेवण्यात यश आले.

Back to top button