औरंगाबाद : तिकीट निरीक्षकामुळे वाचले दोन तरुणींचे प्राण | पुढारी

औरंगाबाद : तिकीट निरीक्षकामुळे वाचले दोन तरुणींचे प्राण

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : लासूर स्टेशनला जाण्यासाठी सचखंड एक्स्प्रेसमध्ये बसलेल्या दोन मुलींनी रेल्वे थांबत नसल्याचे पाहून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही बाब रेल्वे तिकीट निरीक्षकांच्या वेळीच लक्षात आल्याने त्यांनी दोघींना रोखत धीर दिला. अखेर त्यांना रेल्वे प्रवासी सेना, पोलिस आणि रेल्वे अधिकार्‍यांच्या सहकार्याने नातेवाइकांपर्यंत सुखरूप पोहोचवण्यात आले.

लासूर स्टेशन येथे राहणाऱ्या दिशा कोकरे (18) व कोमल शेजूळ (18) या दोघींनी बुधवारी औरंगाबाद स्थानकावरून लासूर स्टेशनला जाण्यासाठी सचखंड एक्स्प्रेस पकडली. या रेल्वेने त्या लासूर स्टेशनकडे निघाल्या. मात्र, लासूर स्टेशन आल्यावरही रेल्वे थांबत नसल्याचे
त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे दोघीही घाबरल्या. रेल्वेतून उडी मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हा प्रकार तिकीट निरीक्षकांच्या लक्षात आला. त्यांनी दोघींना धीर दिला. त्यामुळे दोघी बालंबाल बचावल्या.

पुढे सचखंड एक्स्प्रेस तारूर येथे क्रॉसिंगसाठी थांबली. त्याच वेळी मराठवाडा एक्स्प्रेसही आली. या दोन्ही तरुणींना मराठवाडा एक्स्प्रेसमधून लासूर स्टेशनला आणण्यात आले. रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी, रेल्वे अधिकारी-कर्मचारी, रेल्वे सुरक्षा बल, शिल्लेगाव पोलिसांनी मदत केली.

कुरकुरे न दिल्याने रागावलेल्या सात वर्षांच्या मुलाने धरली रेल्वे शहरातील म्हाडा कॉलनी येथील रहिवासी असलेल्या आणि दुसरीत शिकणाऱ्या एका मुलाने आईकडे कुरकुरे मागितले. आईने नकार दिल्यावर त्याने हट्टच धरला. सांगून ऐकत नसल्याचे पाहून आईने त्याला चापट मारली. त्यामुळे रागावलेला सात वर्षीय मुलगा शाळेच्या बॅगसह बुधवारी थेट नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसमध्ये जाऊन बसला. त्याला एकटे बसलेला पाहून रेल्वे प्रवासी सेनेच्या सदस्यांना शंका आली. त्यांनी त्याच्याशी संवाद साधल्यावर माहिती समोर आली. रेल्वे प्रवासी सेनेच्या सदस्यांनी त्याला वेदांतनगर पोलिसांच्या स्वाधीन केले, अशी माहिती रेल्वे प्रवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी दिली.

Back to top button