औरंगाबाद : मद्यपींचा काटा किर्र, उन्हामुळे बीअर विक्रीत ४६२ टक्के वाढ! | पुढारी

औरंगाबाद : मद्यपींचा काटा किर्र, उन्हामुळे बीअर विक्रीत ४६२ टक्के वाढ!

औरंगाबाद; गणेश खेडकर : ‘पीने वालों को पिने का बहाना चाहिए…’ या हिंदी गाण्याप्रमाणे मद्यपींना ‘बसण्या’साठी जरी काळ-वेळ अथवा मुहूर्त लागत नसला, तरी उन्हाळ्यात चार महिने बिअर पिणाऱ्यांची संख्या मात्र हमखास वाढते. गतवर्षीच्या तुलनेत एप्रिलमध्ये बिअरची तब्बल 462 टक्के विक्री वाढली, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस. एल. कदम यांनी दिली.

महाराष्ट्राला यंदा उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. मार्चपासूनच ऊन जाणवू लागले. एप्रिलमध्ये तापमानात वाढ झाली. मे महिन्यात तर सूर्य आग ओकू लागला. 9 मे रोजी मागील 26 वर्षांचा उच्चांक मोडीत काढत तापमान 43.2 अंशांवर गेले. उन्हाळ्यातील तो सर्वांत ‘हॉट डे’ ठरला. जसे ऊन वाढत गेले, तशी बिअरची विक्री वाढत गेली. एप्रिल 2019-20 मध्ये 6 लाख 46 हजार 968 लिटर बिअरची विक्री झाली होती. गतवर्षी एप्रिलमध्ये लॉकडाऊनमुळे 22 दिवस दुकाने बंद होती. हा आकडा कमी आहे. त्यामुळे तो गृहीत धरला जात नाही, परंतु यंदाच्या एप्रिलमधील आकड्याची तुलना 2019-20 च्या एप्रिलमधील आकड्याशी केली जाते. त्यात एक लाख आठ हजार 548 लिटरची वाढ झाली असून 7 लाख 55 हजार 516 लिटर एवढा आकडा झाला. टक्केवारीत हे प्रमाण तब्बल 462 टक्के एवढे आहे.

बिअर विक्रीची तुलनात्मक माहिती (मार्च अखेरपर्यंत)

2019-20 मध्ये 51 लाख 26 हजार 119 लिटर बिअरची विक्री झाली होती. 2020-21 मध्ये कोरोना लॉकडाऊनमुळे बरीच घट झाली. तो आकडा 36 लाख 64 हजार 921 एवढा होता. 2021-22 मध्ये त्यात बरीच वाढ होऊन आकडा 44 लाख 63 हजार 73 एवढा झाला. 2019-20 पेक्षा 2021-22 मध्ये 13 टक्के घट आली, अशी माहिती कदम यांनी दिली.

महसूल घसरला : इतिहासात पहिल्यांदाच औरंगाबाद दुसऱ्या स्थानी

राज्य शासनाला सर्वाधिक महसूल मिळवून देणारा विभाग म्हणून औरंगाबाद राज्य उत्पादन शुल्क विभागाची ओळख आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात औरंगाबाद विभागाला 4,474.80 कोटी रुपयांच्या महसुलाचे टार्गेट होते. विभागाने 3,937.98 कोटी रुपये महसूल गोळा करून 88 टक्के पूर्तता केली. दरम्यान, 2022-23 साठी औरंगाबाद विभागाला 5,257.30 कोटी रुपयांचे टार्गेट देण्यात आले. यातील एप्रिल महिन्यात तब्बल 357.91 कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला आहे, परंतु औरंगाबाद विभागाचा राज्यात नेहमी प्रथम क्रमांक असतो. यंदा मात्र नाशिक विभाग पुढे आहे. इतिहासात पहिल्यांदाच औरंगाबाद दुसऱ्या क्रमांकावर गेले, अशी माहिती अधीक्षक एस. एल. कदम यांनी दिली.

विदेशी मद्याची विक्रीही वाढली

या काळात विदेशी मद्यविक्रीतही वाढ झाली. 2019-20 मध्ये 53 लाख 94 हजार 303 लिटर, 2020-21 मध्ये लॉकडाऊनमुळे यात घट होऊन 48 लाख 6 हजार 807 लिटर, तर 2021-22 मध्ये यात मोठी वाढ झाली. हा आकडा 59 लाख 82 हजार 52 लिटरवर गेला.

Back to top button