‘कदम नहीं रखने देंगे, ये नेताजी ने ठाना है’ ! आता भोजपूरी गाण्यातून राज ठाकरेंना विरोध ! (video) | पुढारी

'कदम नहीं रखने देंगे, ये नेताजी ने ठाना है' ! आता भोजपूरी गाण्यातून राज ठाकरेंना विरोध ! (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आता हिंदुत्वाचा मुद्दा अधिक आक्रमकपणे धरला आहे. अशातच त्यांनी ५ जूनला मी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर वादविवादांना उधाण आलं आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध दर्शविला आहे. राज ठाकरे यांनी प्रथम उत्तर भारतीयांची माफी मागावी, त्यानंतर अयोध्येत पाऊल ठेवावे, अशी मागणी बृजभूषण सिंह यांनी केली आहे. सिंह यांच्या मागणीला मनसेच्या नेत्यांकडूनही प्रतिआव्हान देण्यात आलंय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेतेही अयोध्या दौऱ्यावरून राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत.

राज ठाकरे हे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन मैदानात उतरले असून ते जूनच्या पहिल्य आठवड्यात अयोध्येला जाणार आहेत. पण त्यांच्या समोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. राज यांच्या अयोध्या दौऱ्याला बृजभूषण सिंह यांनी कडाडून विरोध केला आहे. यासाठी त्यांनी नुकतीच एक सभा घेत राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा दिला आहे. त्यातच आता सिंह यांच्या समर्थकांनी एक भोजपुरी गाणं तयार करून राज ठाकरेंच्या विरोधातील वातावरण आणखीनच तापवण्याचा प्रयत्न केला आहे.

राज ठाकरे यांनी माफी मागावी असे आव्हान करत या व्हिडिओ अल्बमचे नाव ‘माफी मांगो राज ठाकरे’ असे ठेवण्यात आले आहे. सोशल मीडियावर हे गाणे व्हायरल झाले असून आता पुन्हा एकदा वादा उफाळण्याची चिन्हे आहेत. महेश निर्मोही हे गाणे गायले असून योगेश दास शास्त्री यांनी ते लिहिले आहे. संगीत बब्बन आणि विष्णु या जोडीचे आहे. गाण्याचे बोल पुढील प्रमाणे आहेत… कदम नहीं रखने देंगे ये नेताजी ने ठाना है…. माफी मांगो राज ठाकरे अगर अयोध्या आना है…

आता मनसे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून राज ठाकरे माफी मागणार का? की अयोध्या दौरा रद्द होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Back to top button