पैठण : वाळू तस्करांकडून महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न | पुढारी

पैठण : वाळू तस्करांकडून महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील अवैध वाळू तस्करांचे केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरडपुरी येथे बुधवार पहाटे गोदावरी नदीतून अवैधरित्या वाळूतस्करी करणाऱ्या वाहनाचा पैठण महसूल वाळू विरोधी पथकाने ४० किलोमीटर पर्यंत फिल्मी स्टाइलने पाठलाग केला. सदरील वाहन पाडळसिंगी (ता. गेवराई, जिल्हा बीड) टोलनाका जवळ पकडण्याचा प्रयत्न केला. यानंतर वाहन चालकाने महसूल पथकाच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवाने यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. हिरडपुरी, पैठण, पाटेगाव, दादेगाव, कावसान, नवगाव येथील परिसरातून गोदावरी नदीतील अवैधरित्या वाळू तस्करी रोखण्यासाठी मंगळवारी रात्री उशिरा उपविभागीय अधिकारी डॉ स्वप्नील मोरे व तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांनी महसूल विभागाचे वाळू विरोधी पथकातील मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांची संयुक्त बैठक घेऊन वाळू तस्करी करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याची मोहीम राबवण्यासाठी वेगवेगळ्या पथकाला खासगी वाहनातून जाऊन कारवाईचा आदेश दिला होता.

तसेच, त्यानुसार विहामांडवा मंडळ अधिकारी सुखानंद बनसोडे, पाचोड जे. बा. केकन, तलाठी राम केंद्रे, सुधाकर निकम, कोतवाल रवींद्र सोनटक्के, सोमनाथ कोल्हे, अमोल भोसले यांचे पथक हिरडपुरी येथे गोदावरी नदीत बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास कारवाईसाठी आले होते. हे वाळू तरस्‍करी करण्याऱ्याच्या लक्षात येताच अवैधरित्या वाळूने भरलेला मिनीट्रक पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्‍न केला. जवळपास ४० किलोमीटर अंतरावर पाडळसिंगी (ता. गेवराई, जि. बीड) टोलनाक्याजवळ सदरील महसूल पथकाने पाठलाग करत वाहन पकडले.

यावेळी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाने पथकाच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवानं कुठलाही अनुचित घटना यावेळी घडली नाही. पथकातील कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी डॉ स्वप्नील मोरे व तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांना घटनेची माहिती देऊन सदरील वाहन जप्त करून पैठण येथील तहसील जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांनी दिली आहे.

हे ही वाचलं का  

Back to top button