पैठण तालुक्यातील वडजी येथे चोरांचा धुमाकूळ, सहा लाखांचा ऐवज लंपास | पुढारी

पैठण तालुक्यातील वडजी येथे चोरांचा धुमाकूळ, सहा लाखांचा ऐवज लंपास

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील वडजी गावामध्ये शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ (वडजी येथे चोरांचा धुमाकूळ) घातला. या गावातील सखाराम टोपाजी वाघमारे यांच्या घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण सात लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश सुराशे पथकासह दाखल झाले असून चोरट्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरु केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील वडजी गावामध्ये (वडजी येथे चोरांचा धुमाकूळ) शुक्रवारी (दि.१०) मध्यरात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास पाच ते सात अज्ञात चोरट्यांनी हातामध्ये लाठ्या-काठ्या घेऊन सखाराम टोपाजी वाघमारे यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी सखाराम वाघमारे नेहमीप्रमाणे कुटुंबासह घरात झोपले होते. चोरट्यांनी ते झोपलेल्या रूमला बाहेरून कडी लावली आणि इतर रूममध्ये ठेवलेल्या कपाटामधील सोन्या-चांदीचे दागिन्यासह (जवळपास पाच लाखांचा ऐवज) रोख रक्कम १ लाख १० हजार रुपये लंपास केली.

या दरम्यान चोरट्यांनी ऐवज असलेल्या पेट्या घराच्या बाहेर नेऊन यामधील दागिने व रोख रक्कम काढून घेवून पोबारा केला. चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून देत तासभर धुमाकूळ घातला.

सदरील घटनेची माहिती पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरासे यांना मिळाल्याने त्यांनी ताबोडतोब पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांनी माहिती दिली. यानंतर तात्काळ पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांना पथकासोबत घटनास्थळी भेट दिली. पुरावा जमा करून चोरट्याचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याच दरम्यान पैठण उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांनीदेखील घटनास्थळी भेट देवून चोरट्यांचा जलद गतीने शोध लावण्याच्या सुचना पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश सुराशे, पोलीस उपनिरीक्षक सुताळे, सुधाकर मोहिते, सचिन भूमे यांना दिल्या आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button