मुंबई; पुढारी वृत्तसेवा : भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) सुरु असलेल्या खुल्या चौकशीला अखेर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे हजर राहिले आहेत. एसीबीने मंगळवारी दोन तास चौकशी करत त्यांचा जबाब नोंदविला आहे. या चौकशीत सिंग यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळल्याची माहिती मिळते. (Param Bir Singh)
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया निवास्थानाजवळ स्फोटके ठेवल्याचे प्रकरण आणि ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन हत्याप्रकरणाचा ठपका ठेवून राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन उचलबांगडी केली होती. त्यानंतर परमबीर सिंग यांनी देशमुखांवर पोलीस अधिकार्यांना १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली होती.
पुढे परमबीर सिंग यांच्या विरोधातही गैरकारभार, भ्रष्टाचार आणि खंडणी वसुलीच्या तक्रारीचे सत्र सुरू झाले. यातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची गंभीर दखल घेत एसीबीने चौकशी सुरु केली.
मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांच्या तक्रारीवरुन राज्य शासनाने एसीबीला सिंग यांच्या विरोधात खुली चौकशी करण्यासाठी गेल्यावर्षीच्या जुलै महिन्यात परवानगी दिली होती. त्यानुसार एसीबी तपास करत आहे.
एसीबीने जानेवारी महिन्यात १० आणि १८ तारखेला सिंग यांना चौकशीला बोलावले होते. मात्र दोन्ही वेळी सिंग हजर राहिलेले नाहीत. त्यानंतर एसीबीने सिंग यांना नव्याने समन्स बजावत ०२ फेब्रुवारी रोजी चौकशीला बोलावले होते.
सिंग हे तिसऱ्या समन्सला हजर रहातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयात काम असल्याचे सांगत ०१ फेब्रुवारी रोजी आपला जबाब नोंदविण्याच्या मागणीचे पत्र एसीबीला पाठवले होते.
एसीबीच्या तपास अधिकाऱ्याने सिंग यांना ०१ फेब्रुवारी रोजी जबाब नोंदविण्यास येण्याची परवानगी दिली. त्यानुसार सिंग हे मंगळवारी एसीबीसमोर हजर झाले. एसीबीने सिंग यांची दोन तास चौकशी करत त्यांचा जबाब नोंदविला आहे. आवश्यकता भासल्यास सिंग यांना पुन्हा चौकशीला बोलावण्यात येईल असे एसीबीकडून सांगण्यात आले आहे.