Maratha Reservation : मराठा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा; दोन महिन्यांनी कारवाई | पुढारी

Maratha Reservation : मराठा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा; दोन महिन्यांनी कारवाई

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : जमावबंदी आदेश झुगारून मनोज जरांगे पाटील यांच्या पायी मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 जानेवारी रोजी घडलेल्या घटनेनंतर 19 मार्चला हा गुन्हा पाथर्डी पोलिसांनी दाखल करून घेतला आहे. जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबई येथे उपोषणास पाथर्डी तालुक्यातून 22 जानेवारीला पायी मोर्चाने गेले. त्यावेळी विष्णूपंत अकोलकर, महेश बोरुडे, बबन सबलस, उद्धव माने, आजिनाथ देवढे, बंडू बोरुडे, सुनील कदम, अप्पासाहेब बोरुडे (सर्व रा. पाथर्डी) व इतर लोकांनी पाथर्डी शहरातील नाईक चौकात जरांगे यांचे स्वागत केले.

यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. एक मराठा लाख मराठा, मनोज जरांगे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, एकच मिशन, मराठा आरक्षण, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या होत्या. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध सुमारे दोन महिन्यानंतर पाथर्डी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कॉन्स्टेबल भगवान मधुकर सानप यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राम सोनवणे तपास करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button