फडणवीसांच्या काळात महाराष्ट्र रसातळाला ; सुषमा अंधारे यांची घणाघाती टीका | पुढारी

फडणवीसांच्या काळात महाराष्ट्र रसातळाला ; सुषमा अंधारे यांची घणाघाती टीका

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्र रसातळाला गेला असून, देवेंद्र पर्व हे म्हणजे नुसते षड्यंत्र, कपटनीतीचे नसून तर हे राजकीय नीतीमूल्याच्या र्‍हासाचे पर्व म्हणून ओळखले जाईल, अशी घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. राजकारणात अडसर ठरणार्‍यांविरुद्ध ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग या स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. सिंदखेडराजा ते मुंबई या मुक्त संवाद पदयात्रेचे शिवसेनेतर्फे मंगळवारी सायंकाळी शहरात जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी अजंठा चौकात आयोजित सभेत अंधारे बोलत होत्या.

पदयात्रेवर जेसीबीच्या साह्याने फुलाची उधळण करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, तालुकाप्रमुख भगवान दराडे, प्रकाश आंधळे, महेश पाटील, शिवशंकर राजळे, नवनाथ चव्हाण, बाबासाहेब ढाकणे, भाऊसाहेब धस, अशोक जाधव, शंकर मेटके, मीरा दराडे, सविता भापकर, रत्नमाला उदमले, आरती निर्‍हाळी आदी उपस्थित होते. अंधारे म्हणाल्या, की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन समाजांना झुंजविण्याचे काम सरकार करीत आहे. भाजपचे हिंदुत्व म्हणजे फसवणूक आहे. लोकांच्या डोळ्यांत आलेले पाणी पुसण्याबरोबर लोकांच्या चुली पेटवून देणे हे खरे आमचे हिंदुत्व जास्त महत्त्वाचे आहे.

गेल्या दहा वर्षांत गुन्हेगारी वाढली असून, गलिच्छ राजकारणाचा कळस झाला आहे. भरदिवसा पोलिस ठाण्यात गोळ्या झाडल्या जातात, अशी भीषणपरिस्थिती राज्यात झाली आहे. फडणवीस यांच्या काळात सुडाचे राजकारण सुरू झाले. सत्ताधार्‍यांनी पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या करून त्रासदायक ठरणार्‍यांना खोट्या गुन्ह्यात गुंतविण्याचा काम सध्या सुरू आहे. नोकर भरती, पेन्शन, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कंत्राट भरती, बेरोजगारी, महागाई, महिला सुरक्षा, शेतकरी या सगळ्या मुद्यांवर हे सरकार अपयशी ठरले असल्याची टीका त्यांनी केली. प्रास्ताविक भगवान दराडे यांनी केले. नंदकुमार डाळिंबकर यांनी आभार मानले.

Back to top button