नागवडे-नाहटा जोडी जोरात, कार्यकर्ते नाराज ! | पुढारी

नागवडे-नाहटा जोडी जोरात, कार्यकर्ते नाराज !

अमोल बी.गव्हाणे

श्रीगोंदा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांनी काँगेसला रामराम करत आज पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश केला. अर्थात या संपूर्ण घडामोडीमागे राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहटा यांची स्ट्रॅटजी कामाला आली. नागवडे उभयतांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने नागवडे-नाहटा ही जोडी तालुक्यात जोरात असली तरी, नागवडे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाहटा यांच्याविषयीची नाराजी अद्याप दूर होताना दिसत नाही. नागवडे गटाच्या यंत्रणेत नाहटांंचा हस्तक्षेप कार्यकर्त्यांना न रूचणारा असल्याचे दिसून येत आहे.
सन 2024 सुरू होताच तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला. दोन वर्षांपूर्वीच नागवडे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यांची यंत्रणाही सक्रिय झाली आहे.

गावोगावच्या ग्रामपंचायत, सेवा संस्था निवडणुकीत त्यांनी घातलेले लक्ष सर्व काही स्पष्ट करते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर नागवडे यांनी बाळासाहेब नाहटा यांच्यामार्फत पक्ष प्रवेश करण्याबाबत फिल्डिंग लावली. त्यात लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत निवडणुकीत नाहटा यांना माजी आमदार राहुल जगताप यांनी मदत न केल्याने, नाहटा-जगताप यांच्यात काही अंशी का होईना अंतर पडले. हीच बाब लक्षात घेऊन नाहटा यांनी नागवडे यांच्यासाठी स्वतःची स्ट्रॅटजी राबवित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शब्द टाकला. अन् नागवडे यांच्या पक्ष प्रवेशासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. अर्थात पवार हे नागवडे यांच्या प्रवेशासाठी अनुकूल होतेच.
नागवडे यांनी विधानसभेचा शब्द घेतल्यानंतरच हा प्रवेश निश्चित झाला असल्याचे बोलले जात आहे. अर्थात यासाठी अजून काही महिने वाट पहावी लागणार आहे. तत्पूर्वी लोकसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीवरच विधानसभा निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

काही वर्षापूर्वी नागवडे यांच्या विरोधात रान पेटविणारे नाहटा आता नागवडे यांचे गुणगान गाऊ लागले आहेत. हा राजकारणाचा महिमा श्रीगोंदेकर नव्याने अनुभवत आहेत. मात्र, नाहटा यांच्या मध्यस्थीने नागवडे यांनी केलेला पक्षप्रवेश नागवडे गटाच्या कार्यकर्त्यांना रुचलेला नाही. नागवडे गटाच्या गोटात नाहटा यांची उठबस अनेकांना डोकेदुखी वाटत आहे. अर्थात, नाहटा यांचे राजकीय कौशल्य सर्वश्रुत आहे. नागवडे कारखाना निवडणुकीत आपण उमेदवारी करणार नाही, असे स्पष्ट करणार्‍या नाहटा यांनी थेट राजेंद्र नागवडे यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केली. एवढेच नाही तर निवडणुकीत रंगत निर्माण करत, नागवडे यांना सळो की पळो करून सोडले होते.
राजकारणात सर्व काही माफ असते, असे नेहमीच म्हटले जाते. राजेंद्र नागवडे अन बाळासाहेब नाहटा एकत्र आले, मात्र त्यांचं एकत्र येणं कार्यकर्त्यांना मान्य नसल्याचे दिसते. अर्थात राजेंद्र नागवडे कार्यकर्त्यांची कशी समजूत घालतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Back to top button