मंत्री छगन भुजबळांना त्यांच्या पक्षश्रेष्ठींचेच खतपाणी : जरांगे पाटील | पुढारी

मंत्री छगन भुजबळांना त्यांच्या पक्षश्रेष्ठींचेच खतपाणी : जरांगे पाटील

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : ‘ते ज्या पक्षात आहेत, त्यांचे पक्षश्रेष्ठीच त्यांना एकप्रकारे खतपाणी घालत आहेत. त्यांना आवरा नाही, तर मराठा समाजाच्या रोषाला तुम्हाला सामोरे जावे लागणार, हे नक्की, असा इशारा मनोज जरागे पाटील यांनी आज मंत्री छगन भुजबळ व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नामोल्लेख न करता दिला. सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांची श्रीगोंदा येथे आज रात्री उशिरा जाहीर सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर केले; मात्र जोपर्यंत आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत मी एक इंचही मागे हटणार नाही, मग त्यासाठी माझा प्राण गेला तरी बेहत्तर… असा आक्रमक पवित्रा जरांगे पाटील यांनी जाहीर केला.

मराठा समाजाला 75 वर्षांनंतर आरक्षण मिळाले. हे आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी कायदा पारित होणे गरजेचे आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाने एकजूट दाखवली, तशीच एकजूट कायम ठेवावी लागणार आहे. आतापर्यंत 57 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्याचा फायदा दोन कोटी मराठ्यांना होणार आहे. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांनाही आरक्षण मिळवून देण्यास सरकारला भाग पाडू. 75 वर्षांनंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला. एवढ्या वर्षात आरक्षण मिळाले असते तर मराठ्यांचा नोकरीतील टक्का कितीतरी पटींनी वाढला असता.

मंडल आयोगाला चॅलेंज करणार
मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले, की राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले मात्र काही लोक या आरक्षणाला हरकती घेण्याच्या हालचाली करत आहेत जर अस कुणी आरक्षणाला विरोध केला तर आपण मंडल आयोगाला चॅलेंज करणारच, असा इशारा त्यांनी दिला.

आजपासून उपोषण
सग्यासोयर्‍यांच्या कायद्याची राज्य सरकारने तत्काळ अंमलबजावणीसाठी आजपासून (दि. 10) आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहोत. आता ही अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण एक इंचही मागे हटणार नाही, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.

Back to top button