Nagar : राहुरीत निळवंडेच्या कालव्याच्या पाण्याचा श्रेयवाद | पुढारी

Nagar : राहुरीत निळवंडेच्या कालव्याच्या पाण्याचा श्रेयवाद

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : 54 वर्षांपासून असलेली निळवंडेच्या पाण्यासाठी प्रतीक्षा संपुष्टात आल्यानंतर राहुरी तालुक्यात पाण्याचा श्रेयवादाची स्पर्धा लागल्याचे आज दिसून आले.  माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, धनश्री विखे यांनी राहुरीत निवळवंडे पाण्याचे जलपूचन केले. त्यापाठापोठ आ. प्राजक्त तनपुरे यांनीही कालव्यास भेट देत गुलाल उधळला.  महाविकास आघाडी शासन काळात तत्कालिन जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठबळाने आणि माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या पाठपुराव्याने कोट्यवधी रूपयांचा निधी मिळविल्यानंतर निळवंडे कालव्याच्या पाण्याचे स्वप्न साकार झाल्याचा दावा आ. प्राजक्त तनपुरे यांनी केला. राहुरी तालुक्यातील निंभेरे, तुळापूर या पश्चिम भागातील गावांना आ. तनपुरे यांनी भेटी दिल्या. शेतकरी व महिलांकडून आ. तनपुरेंचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले व धनश्री विखे यांनीही निळवंडे कालव्याचे पाणी येताच लाभार्थी गावांमध्ये भेटी दिल्या. नेहमीप्रमाणे कर्डिले यांनी आ. तनपुरेंवर तोफ डागत निळवंडे कालव्याच्या पाण्याचे श्रेय आमचेच असल्याच दावा केला. राज्यातील युती शासनाकडून आम्ही निधी आणतो व आ. तनपुरे हे फ्लेक्सबाजी करून श्रेय घेत असल्याची टिका जिल्हा बँकेचे अध्यक्ष कर्डिले यांनी केली. कर्डिले व विखे यांच्या हस्ते निंभेरे-कानडगाव येथे जलपूजन झाले.
निळवंडेचे पाणी तालुक्यात वाहताना मनस्वी आनंद होत आहे. महायुतीपेक्षा महाविकास आघाडी सरकारने सर्वाधिक निधी दिला. कोवीड काळातही निधीची कमतरता भासू दिली नाही. त्यामुळे निळवंडे कालव्याच्या कामाला मोठी गती मिळाली होती. संगमनेर, राहुरीच्या सिमेवर बोगदा निर्मितीत अनंत अडचणी आल्या. परंतू महाविकास आघाडी सरकारच्या काळात बोगदा तयार होऊन निळवंडेचे पाणी राहुरीत आणण्यात यश मिळाले. आमदारकीच्या माध्यमातून निळवंडे कालव्यासाठी बहुमोल योगदान दिल्याचे सार्थक झाले.
                                                                                                  – प्राजक्त तनपुरे, आमदार. 
राहुरीकरांची निळवंडेच्या पाण्याची प्रतिक्षा संपल्याचा आनंद आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खा.डॉ.सुजय विखे व माजी आमदार कर्डिले यांच्यामुळेच राहुरीच्या पश्चिम पट्यातील जिरायत गावांना सुवर्णयोग लाभला. आ. तनपुरे यांनी राज्यमंत्री असताना निळवंडेसाठी काहीच केले नाही. आता तनपुरे पिता पुत्र केवळ फ्लेक्सबाजीच्या माध्यमातून फुकटचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.
                                                                                                         – धनश्री विखे पाटील

Back to top button