दूध भेसळीलाही लगाम लावणार : खासदार सुजय विखे | पुढारी

दूध भेसळीलाही लगाम लावणार : खासदार सुजय विखे

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : वाळू तस्करीला लगाम लावला असून, आता दूध भेसळ करणार्‍यांवर लगाम लावण्याची वेळ आली आहे. ज्या गोष्टी समाजासाठी घातक ठरतात, त्या बंद करण्याचे काम राज्य सरकार करेल. आता सरकार दूध देणार्‍या गायींचे टॅगिंग करून ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर, त्या दुधाला सरकार अनुदान देणार आहे, असे खासदार डॉ.सुजय विखे म्हणाले. पाथर्डी तालुक्यातील वाळुंज, आगासखंड, शेकटे, फुंदे टाकळी व येळी या ठिकाणी खासदार विखे व आमदार राजळे यांच्या प्रयत्नातून झालेल्या विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी खासदार विखे बोलत होते.

भगवानगड व 46 गावांची पाणी योजना मंजूर करून आणल्याबद्दल आमदार मोनिका राजळे यांचा येळी गावात भव्य नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रामगिरी महाराज, अभय आव्हाड, माणिक खेडकर, अमोल गर्जे, अजय रक्ताटे, अ‍ॅड. प्रतीक खेडकर, धनंजय बडे, भगवान आव्हाड, अंकुश कासोळे, संजय बडे, महादेव जायभाये, संजय कीर्तने, वामन कीर्तने, काशीबाई गोल्हार, राजेंद्र जायभाये, राहुल कारखिले, डॉ. सुहास उरणकर, अशोक खरमाटे, सरपंच शुभांगी जगताप, अजित देवढे, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले, भेसळयुक्त दूध हे प्रत्येक लहान मुलाच्या शरीरात जात असून, पुढच्या पिढीसाठी हे हानीकारक आहे. मनुष्याच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक दूध भेसळीला आळा घालण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. येत्या काळात यासाठी मोहीम हाती घेतली जाणार आहे. राज्य सरकारने गायीच्या दुधाला पाच रूपये अनुदान जाहीर केले आहे. त्यासाठी शेतकरी व दूध उत्पादकांनी आपल्या गायींचे टॉगिंग करून ते ऑनलाईन केल्यानंतर अनुदान प्राप्त होणार आहे. त्यामुळे दूध भेसळीला आळा बसेल.

विरोधकांनी योजनेचा इतिहासच बदलला

यावेळी आमदार राजळे म्हणाल्या, भगवानगड व 46 गावांच्या पाणी योजनेचा इतिहासच विवरोधकांनी बदलून टाकला आहे. योजना मंजुरीची प्रत्यक्षात सुरुवात पंकजा मुंडे मंत्री असताना पाणीपुरवठा मंत्री बबन लोणीकर यांच्या माध्यमातून झाली. त्यामुळे कुणी ऑनलाईन पद्धतीने या योजनेचे उद्घाटन जरी केले असले तरी, योजना कुणी मंजूर केली, हे सर्वांना माहित आहे. या योजनेचे खरे प्रणेते संजय बडे असून, प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामस्थांनी योजना मंजूर होण्यासाठी परिश्रम घेतले. लोकप्रतिनिधी म्हणून सकारात्मक प्रतिसाद देऊन ही योजना मंजूर करून घेतली आहे.

कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, हे काम खासदार सुजय विखे यांच्यामुळेच पूर्ण झाले आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका स्मिता लाड, मधुकर देशमुख, भीमराव फुंदे, पांडुरंग लाड, दिनकर पालवे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत संजय बडे यांनी केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन दत्ता बडे यांनी केले.

हेही वाचा

Back to top button