नगर : प्रत्येक घरावर डौलाने फडकवा तिरंगा ; जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ | पुढारी

नगर : प्रत्येक घरावर डौलाने फडकवा तिरंगा ; जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

नगर : पुढारी वृत्तसेवा : देशासाठी बलिदान दिलेल्याचे स्मरण व्हावे, यासाठी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या तीन दिवशी प्रत्येकांनी आपापल्या घरावर तिरंगा ध्वज डौलाने फडकवा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हाभरातील नागरिकांना केले आहे. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे. सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. गेल्या वर्षी देखील तीन दिवस सर्वच नागरिकांनी आपापल्या घरावर तिरंगा फडकवला होता. यंदा देखील 15 ऑगस्टलादेखील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवला जावा, यासाठी प्रत्येक पोस्ट कार्यालयांत सशुल्क ध्वज उपलब्ध होणार आहे. तिरंगा ध्वजासाठी जिल्हा प्रशासनाकडूनही पुढाकार घेतला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सालीमठ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हाधिकारी सालीमठ पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने ‘मेरी माटी, मेरा देश’ या नव्या उपक्रमाची घोषणा केली. मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी, यासाठी 9 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या कालावधीत अभियान राबविले जाणार आहे.

गणेश मंडळांना बक्षीस
आगामी गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरण सजावटचा वापर व्हावा, यासाठी राज्य सरकारने गणेश मंडळांसाठी स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी पाच लाखांचे पहिले, अडीच लाखांचे दुसरे तर एक लाखाचे तिसरे बक्षीस असणार आहे. या स्पर्धेत भाग घेणार्‍या गणेशोत्सव मंडळांना पोलिस प्रशासन, धर्मदाय आयुक्त व नगरपालिका, नगरपंचायती वा महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी घेऊन मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीकडे 10 जुलै ते 5 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करावे लागणार असल्याचे जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितले.

‘एमपीडीए’अंतर्गत सात प्रस्ताव
जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी ही दुर्दैवी बाब आहे. या गुन्हेगारीला चाप लावला जाणार असून, ‘एमपीडीए’ अंतर्गत 7 प्रस्ताव उपलब्ध झाले आहे. गंभीर गुन्हे दाखल असणार्‍यांवर लवकरच कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितले. गुन्हेगारीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी समाजात प्रबोधन आवश्यक असून, वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन निश्चितच कारवाई करेल, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा : 

वारणानगर ९ कोटी चोरी प्रकरणातील संशयित सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा खून

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ऑक्टोबरपासून सकाळी-रात्री अशा दोन सत्रात

Back to top button