पारनेर : श्रेयासाठी विरोधकांचा आटापिटा ! आ.लंके यांची टीका | पुढारी

पारनेर : श्रेयासाठी विरोधकांचा आटापिटा ! आ.लंके यांची टीका

पारनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : आम्ही मंजूर केलेल्या विकासकामांचे श्रेय घ्णयासाठी विरोधकांचा आआपीटा चालू आहे. विकासकामांची खोटी भूमिपूजने करण्याचा तालुक्यातील काहींनी धंदा सुरू केला असल्याची टीका आमदार नीलेश लंके यांनी केली.
वाडेगव्हाण ते कळमकरवाडी, कान्हेर ओहोळ ते वडनेर हवेली, गटेवाडी ते घाणेगाव, कान्हूर पठार ते कोरठण खंडोबा या सुमारे 16 कोटी 80 लाख रूपये खर्चाच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन आमदार लंके यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. बाजार समितीचे सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

आमदार लंके म्हणाले, आमची सोशल मीडियावर विकासकामांची मंजुरीची पोस्ट पडली की, त्यावरील आमचा फोटो काढून त्यांचा फोटो लावून त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. पोष्टमधील वाक्य तेच, काना, मात्रा वेलांटी, उकारही सगळं तसंच! आरे काय धंदा आहे? आरे तुम्ही मंजूर करून आणा, आम्ही काही म्हणणार नाही. आपली सवय आहे, आपलं ते आपलं, दुसर्‍याला आपण कधी आपलं म्हणत नाही, असे सांगत त्यांनी विरोधकांवर टीकाश्र सोडले.

आम्ही विकासकामांसाठी मोठा निधी आणला. विरोधक मात्र आमच्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. रस्त्यांच्या कामांचेही श्रेय घेण्याचा कालच प्रयत्न झाला. वडनेर हवेलीमध्ये सरपंचाने दोन- चार लोक सोबत घेऊन स्वतःचा फलक लावला. 1 कोटी 55 लाख रूपयांचा निधी सरपंच कोठून आणणार? रांजणगावकर ज्यांना आयुष्यात कधी गुलाल मिळाला नाही, ते तेथे चार-सहा लोकांना घेऊन नारळ फोडायला आले होते. पूर्वी अधिकार्‍यांवर दबाव आणला जात होता. आता अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे अधिकारीही दबावाला न जुमानता आमच्या कार्यक्रमांना येत आहेत. पूर्वी जिल्हा परिषदेकडे असणारे हे रस्ते आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून घेतल्याने शासनाकडून एवढा मोठा निधी मिळाला, असे ते म्हणाले.

यावेळी पारनेरचे उपनगराध्यक्ष राजू शेख, अर्जुन भालेेकर, विजय पवार, दीपक पवार, संदीप सालके, भाऊसाहेब भोगाडे, अमोल यादव, अशोक रोहोकले, विक्रमसिंह कळमकर, अशोक घुले, वैभव गायकवाड, कारभारी पोटघन, सतीश भालेकर, उमाताई बोरूडे, पूनम मुंगसे, सुनील करंजुले, श्रीकांत चौरे, अनिल गंधाक्ते, दीपाली औटी, पाकिजा शेख, संदीप चौधरी, अमित जाधव, सरपंच मंगल गट, उपसरपंच सुनील पवार आदी उपस्थित होते. शिक्षक नेते चंद्रकांत गट यांनी सूत्रसंचालन केले. सूर्यकांत गट यांनी आभार मानले.

गावात विकासगंगा आली : मंगल गट

आमदार नीलेश लंके यांच्यामुळे गावात विकासगंगा आली. रस्ते, कोल्हापुरी बंधारे, सभामंडप, गटार योजना, खुली व्यायामशाळा, बंदिस्त व्यायामशाळा, तलाव दुरूस्ती, पाणी योजना ही कामे झाली. गाव छोटे असूनही आमदार लंके यांनी भरघोस निधी दिल्याचे सरपंच मंगल गट म्हणाल्या.

Back to top button