अहमदनगर जिल्ह्यात खरिपाची 85 टक्के पेरणी | पुढारी

अहमदनगर जिल्ह्यात खरिपाची 85 टक्के पेरणी

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : दमदार पावसाचा अभाव असतानाही जिल्ह्यातील 4 लाख 91 हजार 366 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. सरासरी 84.75 टक्के पेरणी झाली असून, गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेली संततधार पिकांना दिलासा देणारी आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामाला उभारी मिळणार आहे. कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांची पेरणी शंभर टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. पहिल्या महिन्यात पावसाने गुंगारा दिला. जुलै महिन्यात मात्र पावसाने थोडा दिलासा दिला आहे.

त्यामुळे पावसाची सरासरी वाढण्यात यश आले आहे. पाऊस चांगला झाल्यानंतरच खरीप पेरणी करा, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. परंतु शेतकर्‍यांनी या अहवानाला प्रतिसाद न देता पेरणी सुरूच ठेवली. जिल्ह्यात खरिपासाठी 5 लाख 79 हजार 768 हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे. त्यापैकी आतापर्यंत 4 लाख 91 हजार 366 हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. 1 लाख 22 हजार 86 हेक्टर उदिृष्ट होते. मात्र, 1 लाख 31 हजार 645 हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी झालेली आहे. सोयाबीनसाठी 87 हजार 330 हेक्टर क्षेत्र निश्चित केले. उदिृष्टापेक्षा जादा 1 लाख 34 हजार 911 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

बाजरीचा पेरा 40 टक्क्यांवरच

बाजरीचा पेरा फक्त 60 हजार 18 हेक्टरवर झाला आहे. एकूण क्षेत्राच्या तुलनेत 40 टक्के पेरा झाला आहे. मक्याचा पेरा 94 टक्के झाला आहे. भुईमूग, तीळ, कारले, सूर्यफूल या गळीत पिकांची पेरणी सरासरी 42 टक्के झाली. तूर पेरणी 126 टक्के झाली असून, मुगाचा पेरा 35 तर उडीद पेरणी 87 टक्के झाली आहे.

Back to top button