कर्जत : गोदड महाराज यात्रेत लोटला जनसागर | पुढारी

कर्जत : गोदड महाराज यात्रेत लोटला जनसागर

कर्जत (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : येथील ग्रामदैवत थोर संत सद्गुरू गोदड महाराजांच्या रथयात्रेसाठी गुरुवारी भाविकांचा सागर उसळला. राज्यभरातून आलेल्या सुमारे दोन लाख भाविकांनी गोदड महाराजांचे दर्शन घेतले आणि रथयात्रेत सहभागी झाले. भाविकांनी मध्यरात्रीपासूनच मंदिराच्या बाहेर दर्शनासाठी दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रांगा लावल्या होत्या. अभिषेक करण्यासाठीही मोठी गर्दी होती. मंदिरामध्ये रात्री बरोबर बारा वाजता अभिषेक सुरू झाले. याचवेळी दर्शनासाठी देखील मोठी गर्दी झाली होती. मंदिरात सकाळी संगीत भजने झाली. ठिकठिकाणी फराळ, फळे, पाणी, चहाचे मोफत वाटप करण्यात आले.

तहसीलदार गणेश जगदाळे, न्यायाधीश व मानकरी यांच्या हस्ते नारळ वाढवल्यानंतर रथयात्रेस प्रारंभ झाला. त्या वेळी हलका पाऊस सुरू झाला. भव्य अशा लाकडी रथामध्ये पांडुरंगाची मूर्ती ठेवून हा रथ ओढण्याची गोदड महाराजांनी सुरू केलेली परंपरा आजही उत्साहात सुरू आहे. रथ ओढण्यासाठी तरुणांची संख्या मोठी होती. दर्शनासाठी भाविकांनी ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील वारकरी पायी दिंड्या घेऊन आले होते.

दरम्यान, रेस्क्यू कमांडो (महाराष्ट्र कमांडो) फोर्स सन 2000 पासून आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मनोज राऊत, अहमदनगर जिल्हाप्रमुख गणेश जगताप, कमांडो विष्णू जाधव, हुसेन शेख, गणेश ओव्हाळ, उमेश खुणे यांच्या पथकांनी गर्दी नियंत्रणासाठी काम केले.

पोलिसांचा मानाचा ध्वज
यात्रेनिमित्त पोलिस विभागाच्या मानाच्या ध्वजाची मिरवणूक शहरातून काढण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे व प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण पाटील यांच्यासह सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. कर्जत बसस्थानक परिसरात आमदार रोहित पवार यांनी उभ्या केलेल्या प्रतिमात्मक रथाला हार घालून स्वागत करण्यात आले.

आमदार रोहित पवार सहभागी
आमदार रोहित पवार हे देखील या रथयात्रेमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी रथ ओढला, तसेच टाळ वाजवला. फुगडी खेळली. भाविकांसाठी त्यांनी पिण्याचे पाणी व फराळाचे आयोजन केले होते.

हेही वाचा : 

Himachal Pradesh Flood: हिमाचल प्रदेशात पुन्हा मुसळधारेचा अलर्ट; आत्तापर्यंत 91 मृत्यू

नगर : पुणतांबेत दीड लाख भाविकांची मांदियाळी

Back to top button