डेंग्यूचा वाढता ताप ! नगर जिल्ह्यात 30 दिवसांत 27 बाधित | पुढारी

डेंग्यूचा वाढता ताप ! नगर जिल्ह्यात 30 दिवसांत 27 बाधित

नगर :  पुढारी वृत्तसेवा : वातावरणात झालेला बदल, नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे ठिकठिकाणी तयार झालेले कचर्‍याचे ढिग, साचलेली डबकी आणि त्याकडे स्थानिक आरोग्य व ग्रामपंचायत प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष, यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याचे चित्र आहे. जूनच्या 30 दिवसांतच डेंग्यूमुळे 35 रुग्ण तापाने फणफणले आहेत. त्यामुळे जिल्ह्यावरच चिंतेचे ढग दाटलेले दिसत आहेत. पावसाळा सुरू होताच हिवताप, चिकनगुणिया, डेंग्यूसारखे आजार पुढे येतात. या वर्षी मे महिन्यापासूनच वातावरणात बदल झाल्याने डेंग्यूचे रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे सरकारी व खासगी दवाखाने हाऊसफुल पाहायला मिळत आहेत.

दोन महिन्यांत 44 जणांना डेंग्यू
जिल्हा हिवताप विभागाकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात जानेवारी ते जून या सहा महिन्यांत डेंग्यूचे 51 रुग्ण आढळले असून, 122 रुग्ण खासगी हॉस्पिटलमधील तपासणीत ‘एनएस 1’ संशयित सापडले आहेत. यात मेमध्ये 17, जूनमध्ये 27 अशा दोन महिन्यांत 44 रुग्णांना डेंग्यूची बाधा झाल्याचे निदर्शनास आले. 25 रुग्ण संशयित आढळले होते.

निष्काळजीपणा जिवावर बेतणार?
चहाच्या टपरीवरील प्लास्टिक कप परिसरात टाकून दिले जातात, त्यात पावसाचे पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. परिसरात, घराच्या छतावर, अडगळीतील वस्तूंमध्ये पाणी साचणार नाही, डबके तयार होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. ग्रामपंचायतीनेही आठवड्यातून एक ‘कोरडा दिवस’ पाळला पाहिजे, गावातून नियमितपणे घंटागाडी फिरवली पाहिजे, याबाबत कागदोपत्री सूचना केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात किती ग्रामपंचायती याची अंमलबजावणी करतात, याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे पुरते दुर्लक्ष आहे.

मलेरिया, चिकणगुणियाचा एकही रुग्ण नाही
गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत मलेरियाचा एकही रुग्ण आढळला नसल्याचा दावा जिल्हा विकास प्रशासनाने केला आहे. तसेच चिकणगुणियाचीही तपासणी कोणी करून घेतलेली नसल्याचे सांगितले जाते.

साडेपाचशेवर अधिकारी-कर्मचारी तैनात
जिल्हा हिवताप कार्यालयांतर्गत 230 कर्मचारी साथीच्या आजारांच्या प्रतिबंधासाठी काम करतात. त्यांच्यावर 70 सुपरवायझर आहेत. 14 तालुका सुपरवायझर आहेत. एका तालुक्यात सहा-सात आरोग्य केंद्रे आहेत. त्यांचेही कर्मचारी असतात. असे संबंधित विभागाचे 230 व झेडपीचे 300 मिळून 550 पेक्षा अधिक जण सज्ज आहेत. संबंधित विभागाचे अधिकारी रवींद्र कानवडे व सहायक जिल्हा विकास अधिकारी सावंत हे यावर लक्ष ठेवून आहेत.

फॉगिंग मशिन कुठे आहे?
ग्रामपंचायतींनी 14-15 व्या वित्त आयोगातून फॉगिंग मशिन खरेदी केले होते. मात्र मशिन कंपनीमुळे ही खरेदी संशयास्पद झाल्याची त्या वेळी चर्चा होती. परिणामी, आज किती ग्रामपंचायतींचे फॉगिंग मशिन औषध फवारणीसाठी दुरुस्त आहे, याबाबत शंका व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

पुणे : साखर, हुलगा, चवळी दरात मोठी वाढ

नगर : राज्य संरक्षित स्मारक परिसरातील बांधकामास ‘पुरातत्व’ची नोटीस

 

Back to top button