अहमदनगर : गणेशनगर साखर कारखान्याच्या निवडणुकीत विखे गटाला हादरा | पुढारी

अहमदनगर : गणेशनगर साखर कारखान्याच्या निवडणुकीत विखे गटाला हादरा

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : नगर जिल्ह्यातील गणेशनगर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप नेते आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. या ठिकाणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे यांच्या पॅनेलने जोरदार मुसंडी मारून सत्तेकडे वाटचाल सुरू केली आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विखे आणि थोरात यांच्यातील वाद चांगलाच पेटला होता. अहमदनगर जिल्ह्यातील कट्टर राजकीय वैरी असलेले राधाकृष्ण विखे-पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे गणेशनगर कारखान्याच्या निवडणुकीत आमने-सामने आले होते. थोरात यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कोल्हे यांच्याशी युती केली होती. राधाकृष्ण विखे यांनीदेखील निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जोरदार ताकद लावली होती. तथापि त्याचा उपयोग झाला नाही.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना काँग्रेसचे थोरात हे महसूलमंत्री होते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील महसूलमंत्री झाले. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी महसूल खात्यातील गैरव्यवहारांवरून गंभीर आरोप केले होते. साहजिकच गणेशनगरची निवडणूक दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची झाली होती. थोरात यांनी कोल्हेंना सोबत घेऊन विखेंच्या पॅनेलचा धुव्वा उडवला आहे.

हेही वाचा

अहमदनगर : अनाथ बालकांच्या अनुदानात दुपटीने वाढ

राजगुरूनगरला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला रवाना; दौऱ्यात होणार संरक्षणाचे करार

Back to top button