नगर : सिटी बस ‘आरटीओ’च्या फेर्‍यात ; महापालिकेचा प्रस्ताव धूळ खात पडून | पुढारी

नगर : सिटी बस ‘आरटीओ’च्या फेर्‍यात ; महापालिकेचा प्रस्ताव धूळ खात पडून

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील प्रवासी वाहतुकीसाठी महापालिकेद्वारे सुरू असलेल्या शहर बस विभागाकडे 15 बस असून आणखी 15 बसची आवश्यकता आहे. नगरसेवकांनी चार ते पाच नवीन मार्गांवर बससेवा सुरू करण्याची मागणी केली. परंतु, नवीन बस सुरू करण्यासाठी आरटीओची परवानगी आवश्यक असल्याने ते प्रस्ताव गेल्या काही दिवसांपासून आरटीओ कार्यालयात धूळखात पडून असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. महापालिकेची शहर बस सेवा ही एका खासगी संस्थेला चालविण्यास देण्यात आली आहे. सध्या त्या संस्थेकडे 15 बस आहेत.

त्या बस माळीवाडा येथून केडगाव, भिंगार, पाईपलाईन रोड, विखे पाटील हॉस्पिटल या मार्गावर धावतात. महापालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरूडे यांनी तपोवन रोड भागात बस सुरू करण्याची मागणी केली. तर, नगरसेवक सचिन शिंदे यांनी शिवाजीनगर कल्याण रोड, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शहर बस सुरू करावी अशी मागणी केली. तसेच माळीवाडा-कायनेटिक चौक-हनुमाननगर तसेच सारसनगर या मार्गावरही बस सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्याबाबत स्थायी समिती व सर्व साधारण सभेतही ठराव झाले आहेत. मात्र, अद्याप बस सुरू झालेली नाही. नव्याने शहर बस सुरू करण्यासाठी नवीन 15 बसची आवश्यकता आहे. तसेच, नवीन बस सुरू करण्यासाठी महापालिकेच्या शहर बस विभागाने परवानगीसाठी प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) केले आहेत. मात्र, अद्याप त्याला परवानगी न मिळाल्याने नव्याने सुरू होणारी शहर बस आरटीओ कार्यालयात अडकली आहे.

गरज 30 बसची; धावतात फक्त 15
शहरात 192 शाळा, सात महाविद्यालये, एमआयडीसी, कापड बाजार, सावेडी उपनगरात वेगाने निर्माण होणारी बाजारपेठ आणि त्यात दररोज शहर परिसरातील किमान 17 हजार प्रवासी बस व रिक्षाने प्रवास करतात. त्यामुळे शहराला किमान 30 बसची आवश्यकता आहे. मात्र, संबंधित खासगी कंपनीकडून केवळ 15 बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

नगरसेवकांच्या मागणीसाठी नव्याने काही मार्गांवर शहर बस सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. ते प्रस्ताव परवानगीसाठी आरटीओ कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत.
                                                                         – परिमल निकम, अभियंता.

Back to top button