संकटकाळात लढणारा सैनिक मिळाला : उद्धव ठाकरे | पुढारी

संकटकाळात लढणारा सैनिक मिळाला : उद्धव ठाकरे

सोनई : पुढारी वृत्तसेवा :  विविध क्षेत्रांत गेल्या 8 दशकांपासून कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या निवासस्थानी भेट देत माजी मुख्यमंत्री आ. उद्धव ठाकरे यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पत्नी रश्मी उद्धव ठाकरे याही यावेळी उपस्थित होत्या. गडाख कुटुंबियांच्यावतीने आ शंकरराव गडाख यांनी स्वागत करून उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांचा सन्मान केला.
यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, गत दीड वर्षांपूर्वीच जेष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांना भेटायला मला यायचे होते परंतु त्यावेळेस येता आले नाही. यशवंतराव गडाख यांनी आ. शंकरराव गडाख हा लढणारा सैनिक मला संकट काळात दिला आहे. त्यांना मी कधीही विसरणार नाही. यशवंतराव गडाख यांच्या भेटीमुळे नवी ऊर्जा व लढण्यास बळ मिळाले आहे.

गेली अनेक वर्षे यशवंतराव गडाख यांचे नगर जिल्ह्यासह, राज्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान असून त्यांचे काम दीपस्तंभाप्रमाणे आहे. ते सर्वांना प्रेरणादायी असेच आहे. गडाख यांनी नेवासा तालुक्यातील गावा गावात निसर्ग संवर्धनाचे जे काम केले आहे, ते निश्चितच अभिमानास्पद असेच आहे. कुटुंब उभे करण्याचे काम गडाख यांनी केले आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन यशवंतराव गडाख यांच्या हस्ते झाल्याचे व स्व. बाळासाहेब ठाकरे व यशवंतराव गडाख यांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला.
मिलिंद नार्वेकर, विधानसभेचे मा . उपसभापती विजय औटी, नगर उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, नगर दक्षिण जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, महापौर रोहिणी शेंडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, संजय शेंडगे, संभाजी कदम, अशोक गायकवाड, दत्ता जाधव यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Back to top button