नगर : अवकाळीतील 10 बळींच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख | पुढारी

नगर : अवकाळीतील 10 बळींच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख

नगर : पुढारी वृत्तसेवा :  अवकाळी पावसाने दगावलेल्या 10 व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपयांचे अनुदान प्रदान करण्यात आले आहे. दगावलेल्या व्यक्तींमध्ये दोन महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने पिकांबरोबरच फळबागांचे अतोनात नुकसान केले. वीज कोसळून मार्च महिन्यात श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथील राजेंद्र नामदेव मोरे यांचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने नऊ जणांचा बळी घेतला. यामधील आठ जण वीज कोसळून दगावले आहेत.

13 एप्रिल रोजी राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील भाऊसाहेब रंगनाथ गांधले व 15 एप्रिल रोजी नगर तालुक्यातील रुईछत्तीशी येथील अशोक विठोबा गोरे यांचे वीज कोसळून निधन झाले. 26 एप्रिल रोजी वीज कोसळून श्रीरामपूर तालुक्यातील प्रमोेद भाऊसाहेब दांगट व अलका रामदास राऊत, नेवासा तालुक्यातील अमळनेर येथील रावसाहेब बोरुडे, देडगाव येथील सविता राजू बर्फे या चौघांचे बळी गेले.
28 एप्रिल रोजी झालेल्या पावसात नेवासा तालुक्यातील म्हसले येथील साई राजेंद्र शिरसाठ, जामखेड तालुक्यातील दिघोळ येथील भीमराव बाजीराव दगडे यांचे वीज कोसळून तर कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील दत्तात्रय संजय मोरे यांच्या अंगावर झाड कोसळून त्यांचा मृत्यू झाला.

नैसर्गिक आपत्तीमुळे दगावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या वारसाला शासनाकडून चार लाख रुपयांची तत्काळ मदत दिली जात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील दगावलेल्या दहा व्यक्तींच्या वारसांना तालुकास्तरावर आर्थिक मदत प्रदान करण्यात आली आहे. वारसांमध्ये पत्नी, मुलगी, पती व वडील यांचा समावेश आहे.

Back to top button