नगर : पारनेर तालुका बाजार समितीवर कुणाची लागणार वर्णी ? | पुढारी

नगर : पारनेर तालुका बाजार समितीवर कुणाची लागणार वर्णी ?

शशिकांत भालेकर : 

पारनेर : तालुका बाजार समितीत आमदार नीलेश लंके व माजी आमदार विजय औटी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीची निर्विवाद सत्ता आलेली आहे समितीच्या सभापती-उपसभापती पदाची निवडणूक दि. 15 मे रोजी होणार असून, इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आमदार लंके माजी आमदार औटी यांच्या सहमती एक्सप्रेसमुळे या पदांवर कोणाची वर्णी लागते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. पारनेर बाजार समिती निवडणुकीत भाजप व महाविकास आघाडी यांच्यात लढत झाली.

सुरुवातीला तिरंगी होणारी निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार नीलेश लंके, माजी आमदार विजय औटी ही गुरू-शिष्याची जोडी एकत्र आल्याने दुरंगी झाली. महाविकास आघाडीने सुरुवातीपासून भाजपला कडवे आव्हान दिले होते. भाजप या निवडणुकीत खाते खोलेल, अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र, महाविकास आघाडीने सर्व 18 जागा जिंकून भाजपचा या निवडणुकीत दारूण पराभव केला. बाजार समितीवर महाविकास आघाडीचे एकतर्फी वर्चस्व राहिले. त्यामुळे सभापती, उपसभापती निवडीत गटबाजी न होता लंके-औटी ठरवतील, तेच या पदी विराजमान होतील, अशी शक्यता आहे.

निवडणुकीत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीला 13 व शिवसेनेला 5 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादीचा सभापती व शिवसेनेचा उपसभापती हे सूत्र असणार आहे. त्यानुसार राष्ट्रवादीकडून माजी सभापती प्रशांत गायकवाड यांचे नाव आघाडीवर आहे. तसेच, राष्ट्रवादीचे नेते अशोक सावंत, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, माजी सभापती गंगाराम बेलकर या नावांचा देखील विचार होऊ शकतो. तर, उपसभापती पदासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून पद्मजा पठारे यांचे नाव आघाडीवर आहे. तसेच, जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, किसन सुपेकर, शंकर नगरे यांचीही नावे चर्चेत आहेत. याबाबत सर्वस्वी निर्णय आमदार लंके व माजी आमदार औटी हे घेणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांसह तालुक्यातील जनतेची उत्सुकता वाढली आहे.

एक-एक वर्ष रोटेशन पद्धत राबविणार!
महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व जागा निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादीची संख्या जास्त असून, सभापती पद राष्ट्रवादीकडे, तर उपसभापती पद ठाकरे सेनेकडे असणार आहे. मात्र, सर्व संचालकांना संधी मिळावी, यासाठी एक-एक वर्ष रोटेशन पद्धतीने ते दिले जाण्याची शक्यता आहे.

उपसभापती पदावर पठारेंना संधी!
उपसभापती पदासाठी ठाकरे सेनेकडून सर्वांत जास्त मतांनी विजयी झालेल्या पद्मजा पठारे, तसेच शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले यांच्या नावाची चर्चा आहे. यामध्ये पठारे यांच्या नावावर शिक्कामार्फत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Back to top button