नगर : पारनेर नगरपंचायत समित्यांच्या सभापती, स्वीकृत नगरसेवकांची निवड | पुढारी

नगर : पारनेर नगरपंचायत समित्यांच्या सभापती, स्वीकृत नगरसेवकांची निवड

पारनेर (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  नगरपंचायतच्या सभापती पदाच्या व स्वीकृत नगरसेवक निवडी पार पडल्या. नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असल्याने आमदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी झाल्या. नगरपंचायतीची निवडणूक होऊन सव्वा वर्ष झाले आहे. त्यानंतर विषय समितीच्या सभापती पदांच्या निवडी पार पडल्या आहेत. यामध्ये पाणीपुरवठा समितीचे सभापती योगेश मते यांची फेरनिवड करण्यात आली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य म्हणून प्रियंका औटी, सुप्रिया शिंदे, शालुबाई ठाणगे व नवनाथ सोबले यांची निवड करण्यात आली आहे.

बांधकाम समिती सभापतीपदी भूषण शेलार यांची निवड करण्यात आली आहे. सदस्य म्हणून नितीन आडसूळ, अशोक चेडे, शालुबाई ठाणगे, नवनाथ सोबले यांची निवड झाली आहे. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी जायदा शेख यांची, तर सदस्यपदी प्रियंका औटी, सुप्रिया शिंदे, हिमानी नगरे व शालुबाई ठाणगे यांची निवड झाली आहे. आरोग्य समिती सभापतीपदी निता औटी, तर सदस्यपदी विद्या कावरे, प्रियंका औटी, शालुबाई ठाणगे, नवनाथ सोबले यांची निवड करण्यात आली आहे. अर्थ व नियोजन समिती सभापतीपदी उपनगराध्यक्ष सुरेखा भालेकर यांची, तर सदस्यपदी नितीन रमेश अडसूळ, विद्या कावरे, शालुबाई ठाणगे, नवनाथ सोबले, अशा निवडी करण्यात आल्या आहेत. स्वीकृत नगरसेवक श्रीकांत चौरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर डॉ. सादिक राजे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

आमदार नीलेश लंके व माजी आमदार विजय औटी यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी पार पडल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडी असल्याने उद्धव ठाकरे शिवसेनेला नगरपंचायतमध्ये सत्तेत सहभागी करून घेण्यात आले आहे. सेना ठाकरे गटाला महिला बालकल्याण समिती सभापतीपद देण्यात आले आहे.

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदी कुणाची वर्णी?
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाचा कालावधी सव्वा वर्षाचा ठरलेला असून, तो 16 मे रोजी पूर्ण होत आहे. नगराध्यक्ष पदासाठी नितीन अडसूळ, योगेश मते, तर उपनगराध्यक्ष पदासाठी डॉ. विद्या कावरे, प्रियंका औटी, हिमानी नगरे इच्छुक आहेत.तीन बंडखोर

नगरसेवक गैरहजर
नगरपंचायत विषय समिती सभापती निवडणुकीत भाजपचे नगरसेवक अशोक चेडे राष्ट्रवादीच्या गोटात सामिल झाले. महाविकास आघाडीचे 17 पैकी 14 नगरसेवक सभेला हजर होते. तर, शिवसेना (ठाकरे गट) तीन बंडखोर नगरसेवक गैरहजर होते.

Back to top button