नगर : आ. जगतापांकडून शहराचा विकास : आ. आशुतोष काळे | पुढारी

नगर : आ. जगतापांकडून शहराचा विकास : आ. आशुतोष काळे

नगर; पुढारी वृत्तसेवा : तारकपूर रस्ता ते राधाबाई काळे महिला महाविद्यालय रस्ता अत्यंत खराब होता. या रस्त्याच्या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी तातडीने रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी निधी उपलब्ध करून दिला. आमदार जगताप यांचे शहर विकासाचे सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून तारकपूर रस्ता ते राधाबाई काळे महिला महाविद्यालय रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ झाला. यावेळी आमदार आशुतोष काळे बोलत होते. यावेळी आमदार जगताप, ज्ञानदेव पांडुळे, प्रा.माणिक विधाते, अशोक बाबर, अमोल गाडे, प्राचार्य शंकर थोपटे, गणेश शिंदे, तुकाराम कनेरकर, अनिल साळुंखे आदी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले, महिला महाविद्यालयाच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुली चांगल्या दर्जेचे शिक्षण घेत आहे. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने मुली शिक्षणासाठी या महाविद्यालयात येतात. महाविद्यालयात येण्या-जाण्यासाठी रस्त्याअभावी विद्यार्थिनी, शिक्षक, पालक यांचे हाल होत होते.

याची दखल घेत रस्ता काँक्रिटीकरणाचे काम मार्गी लावले आहे. शहरात नियोजनबद्ध विकासाची कामे सुरू आहेत. अनेक प्रलंबित रस्त्यांची कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लागत असून, दळणवळणासाठी चांगल्या प्रकारचे रस्ते तयार होत असल्याने मनाला समाधान मिळत आहे, असे ते म्हणाले.

Back to top button