वादळाने भेंड्याते पत्रे उडाले, झाडेही कोसळली | पुढारी

वादळाने भेंड्याते पत्रे उडाले, झाडेही कोसळली

भेंडा(नगर) : काल (शनिवारी) दुपारी भेंडा बुद्रुक परिसरात वादळी वार्‍यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी जनावरांचे गोठे आणि घरांवरील पत्रे उडाले. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला. शेतात कांदा काढणी सुरू असल्याने काढलेला कांदा भिजला. शेतातील कांदा झाकण्यासाठी प्लस्टिक ,ताडपत्री घेण्यासाठी दुकानदाराकडे गर्दी झाली होती. परंतु शेतातील कांदा झाकल्यानंतर वादळी वार्‍याने प्लास्टिक कागदही उडून गेला.

 

वादळी पावसामुळे लोकनेते मारुतराव घुले पाटिल ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अकौंट आफिसवर दोन मोठी झाडे पडून मोठे नुकसान झाले. भेंडा बसस्थानक, जिजामाता माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय, कारखाना वसाहत परिसरातील झाडे बुंध्यासह उन्मळून पडली. तसेच विजेचे खांब पडल्याने रस्त्यावरील वाहतूक काही वेळ बंद होती.

बसस्थानक परिसरात झाड चारचाकीवर पडले, तर लांडेवाडीत अण्णासाहेब वीर यांच्या रिक्षावर बाभळीचे झाड कोसळले. जिजामाता महाविद्यालय परिसरात एक झाड दुचाकीवर पडले. तागड वस्तीवर नारळाचे झाड ट्रालीवर पडले. साबळे-वाघडकर वस्तीवरील सोमनाथ भीमराज वाघडकर व भीमराज माधव वाघडकर यांच्या म्हशीच्या गोठ्यावरील आणि घरावरील पत्रे उडाले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. विजेचे खांब पडल्याने बहुतेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला.

Back to top button