नगर : सीना नदीची हद्दनिश्चिती सुरू ; कुकडी पाटबंधारे विभाग व महापालिकेच्या पथकाकडून मोजणी | पुढारी

नगर : सीना नदीची हद्दनिश्चिती सुरू ; कुकडी पाटबंधारे विभाग व महापालिकेच्या पथकाकडून मोजणी

नगर : पुढारी वृत्तसेवा : सीना नदीतील अतिक्रमणे हटविण्यासाठी कुकडी पाटबंधारे विभाग व महापालिकेच्या पथकाने दोन दिवसांपासून मोजणी सुरू केली आहे. सीना नदीवरील बोल्हेगाव येथील पुलापासून मोजणी सुरू करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या आठवड्यात अतिक्रमणासंदर्भात झालेल्या बैठकीत सीना नदीतील अतिक्रमणे हटविण्याबाबत निर्णय झाला होता. सीना नदीची हद्दनिश्चिती कुकडी पाटबंधारे विभाग करून देणार असून, महापालिकेच्या पथकाने त्या ठिकाणी उपस्थित राहून खांब रोवून हद्दीची आखणी करावी, असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते.

महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी संबंधित विभागांना सूचना देऊन मोजणीसाठी पथक नेमले आहे. दोन दिवसांपासून सीना नदीत हद्दनिश्चितीसाठी मोजणी सुरू आहे. कुकडी पाटबंधारे विभाग व महापालिकेच्या पथकाने कालपासून नगर-मनमाड रस्त्यावरील बोल्हेगाव येथील सीना नदी पुलापासून मोजणीला सुरुवात केली आहे. नदीची रुंदी मध्यापासून दोन्ही बाजूंना 50 मीटर ठेवण्यात येणार आहे. त्या पद्धतीने मोजणी सुरू असल्याचे समजते. या वेळी महापालिकेचे नगरचनाकार राम चारठाणकर, प्रभारी शहर अभियता पारखी, उपअभियंता श्रीकांत निंबाळकर, उपअभियंता रोहिदास सातपुते आदी उपस्थित होते. सीना नदीची हद्द निश्चित झाल्यानंतर महापालिका नदीतील अतिक्रमणे हटविणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

Back to top button