नगर: राष्ट्रवादीशी घरोबा ठाकरे सेनेला अमान्य, माजी आमदार विजय औटी यांच्या निर्णयाविरोधात शिवसैनिक एकवटले | पुढारी

नगर: राष्ट्रवादीशी घरोबा ठाकरे सेनेला अमान्य, माजी आमदार विजय औटी यांच्या निर्णयाविरोधात शिवसैनिक एकवटले

पारनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: तालुका बाजार समिती निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्र आली असल्याने ही निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी दुरंगी झाली आहे. मात्र, माजी आमदार विजय औटी यांनी घेतलेली भूमिका तालुक्यातील शिवसेनेच्या नेत्यांना मान्य नाही. पंचायत समितीचे माजी सभापती गणेश शेळके यांनी भाजप प्रणित जनसेवा पॅनेलला आपला पाठिंबा दिला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके व शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्यामध्ये विधानसभेला लढत झाली. शिवसेना व राष्ट्रवादीही तालुक्यामध्ये एकमेकांच्या विरोधात अनेक वर्षे लढत आहे. असे असताना बाजार समिती निवडणुकीत माजी आमदार विजय औटी यांनी घेतलेली राष्ट्रवादीसोबत जाण्याची भूमिका शिवसेनेतील बड्या नेत्यांना पटलेली नाही. कोणालाही विश्वासात घेतले नसल्याचे या नेत्यांकडून सांगितले जात आहे. जिल्हा परिषदेचे माजी सभापती काशिनाथ दाते, बाबासाहेब तांबे व गणेश शेळके यांना या निर्णय प्रक्रियेतून बाजूला ठेवण्यात आले. तसेच, शिवसैनिकांची देखील मते जाणून न घेतल्यामुळे तालुक्यातील अनेक शिवसै, निक व पदाधिकारी औटी यांच्या निर्णयासोबत नसल्याचे शेळके यांनी सांगितले.

नुकतीच नगरसेवक युवराज पठारे व काही नगरसेवकांनी भाळवणी येथे खासदार सुजय विखे यांची भेट घेत आम्ही तुमच्या सोबत असल्याचे म्हटले. तसेच, औटी यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याच्या निर्णयाला विरोध दर्शविला. लवकरच आपली भूमिका जाहीर करणार आहे, असे म्हटले. त्यामुळे तालुक्यात शिवसेनेमध्ये अस्वस्थता असून, राष्ट्रवादीसोबत केलेली महाविकास आघाडी तालुक्यातील शिवसैनिकांसह पदाधिकार्‍यांना मान्य नसल्याचे दिसून येत आहे.

ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख श्रीकांत पठारे यांना उमेदवारी दिली गेल्याने दोन पदाधिकारी औटी यांच्यासोबत आहेत. मात्र, इतर शिवसैनिकांना वार्‍यावर सोडत औटी यांनी शिवसैनिकांशी विश्वासघात केला असल्याची खरमरीत टीका शिवसैनिकांकडून होत आहे.

भाजपसोबत घरोबा करणार

औटी यांनी राष्ट्रवादीशी घरोबा करण्याचा निर्णय शिवसैनिकांच्या पचनी पडलेला नाही. शिवसेनेचे माजी सभापती काशिनाथ दाते, बाबासाहेब तांबे, गणेश शेळके हे औटी यांच्या व्यासपीठावर दिसत नाहीत. तसेच तालुक्यातील शिवसेनेचे कोणतेही वजनदार नेते यांच्यासोबत नाहीत. त्यामुळे हे नेते नाराज असून, भाजप सोबत घरोबा करणार असल्याचे बोलले जात आहे.

Back to top button