नगर: विखे-कोल्हे यांच्यातील संघर्ष संपला! खासदार डॉ. सुजय विखे; यापुढे सर्व निवडणुका भाजप एकसंघ लढणार | पुढारी

नगर: विखे-कोल्हे यांच्यातील संघर्ष संपला! खासदार डॉ. सुजय विखे; यापुढे सर्व निवडणुका भाजप एकसंघ लढणार

श्रीरामपूर (नगर), पुढारी वृत्तसेवा: पद्मभूषण स्व. बाळासाहेब विखे पाटील व सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांची लढाई तत्त्वाची व मुद्याची होती. आज काळ बदलला आहे. संजीवनी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे व मी एकत्र बसून भारतीय जनता पार्टीच्या वतीने येथून पुढच्या सर्व निवडणुका एकत्र लढविणार असल्याचा स्पष्ट खुलासा अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला.

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने वाकडी येथील यश पॅलेस येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात खा. विखे बोलत होते. मेळाव्याचे अध्यक्षस्थान भाजपचे ज्येष्ठ नेते गंगाधर पा. चौधरी यांनी भूषविले. यावेळी गणेशचे माजी व्हा. चेअरमन शिवाजीराव लहारे, जि. प. माजी सदस्य राजेंद्र लहारे, पं. स. माजी सदस्य अ‍ॅड. अशोकराव वाघ, चांगदेव लोखंडे, बापूसाहेब लहारे, वाकडीचे लोकनियुक्त सरपंच डॉ. संपत शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

खा. विखे पुढे म्हणाले की, भाजपाचे चिन्ह हे ‘कमळ’ आहे ते कमळ राहात्याचे असो की कोपरगावचे त्यामध्ये फरक करायचा नाही. पूर्वी नेत्यांच्या प्रतिष्ठेसाठी कार्यकर्ता मोडेल. पण वाकणार नाही, अशा भूमिकेत होता. त्याचा दोन्ही नेत्यांना अभिमान होता. पण आज परिस्थिती बदलली आहे. राजकारणात नीतीमत्ता राहिली नाही. राज्याच्या राजकारणात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व सेना यांच्यामध्ये विचारांची पूर्णपणे मोडतोड करून सोयीचे राजकारण सुरू आहे. नेते एकमेकांच्या गळ्यात-गळे घालत असतील तर कार्यकर्त्यांनी भांडायचे कशासाठी? याची समज कार्यकर्त्यांनाही आली आहे.

सत्तेचा वापर आपण जनतेच्या प्रश्नासाठी केला आहे. जनतेचा विकास करण्यासाठी सत्ता हवी असते. गेल्या तीन वर्षात आघाडी सरकारने आपले एक रुपयाचे काम केले नाही हे आपण अनुभवले आहे. त्यामुळे यापुढे राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ताकद राज्याला दाखवून देण्यासाठी राहाता बाजार समिती निवडणुकीत जनसेवा मंडळाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आश्वासन खा. विखे यांनी केले.

यावेळी ज्येष्ठ नेते गंगाधर पा. चौधरी, शिवाजीराव लहारे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी सर्व उमेदवारांचा परिचय प्रमोद रहाणे यांनी केला. तर आभार राजेंद्र लहारे यांनी मानले. मेळाव्यासाठी उमेदवार आण्णासाहेब कडू, विजय कातोरे, संतोष गोर्डे, दत्तात्रय गोरे, ज्ञानेश्वर गोंदकर, ज्ञानदेव चौधरी, बाबासाहेब शिरसाठ, मीना निर्मळ, रंजना लहारे, दिलीप गाडेकर, राजेंद्र धुमसे, जालिंदर गाढवे, राहुल धावणे, सुभाष गायकवाड, शांताराम जपे यांच्यासह ग्रामपंचायत, सेवा संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावोगावी चर्चासत्र घेणार

आपले नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा कामाचा व्याप वाढला आहे. मीही नगर दक्षिणेतील खासदार आहे. तेथील जनतेने एवढे प्रेम केले. त्यांना न्याय द्यायचा आहे. त्याचबरोबर राहाता मतदार संघातील प्रत्येक गावासाठी दोन तास वेळ देऊन थेट जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करणार आहे. आपण गावातील सर्व प्रश्न मांडा, ते मी सोडविणार असल्याचे आश्वासन खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील यांनी दिले.

Back to top button