सोलापूरचा महेंद्र गायकवाड शिवराय केसरीचा मानकरी | पुढारी

सोलापूरचा महेंद्र गायकवाड शिवराय केसरीचा मानकरी

नगर; पुढारी वृत्तसेवा : बिग बजेट असलेल्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम कुस्ती महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात पुन्हा एकदा रंगली. महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेतही त्यांच्यातच अंतिम लढत रंगली होती. तीच अंतिम लढत जणू नगरकरांना रविवारी पाहायला मिळाली.

कुस्तीमध्ये शिवराज राक्षेने आक्रमकपणे एकामागून एक डाव टाकत महेंद्र गायकवाडला थकवले होते; परंतु महेंद्र गायकवाडने टाकलेल्या एका डावात शिवराजच्या पायाला दुखापत झाल्याने त्याने कुस्ती सोडून दिली. यानंतर पंचांनी महेंद्र गायकवाडला विजेता घोषित केले. त्याला 35 लाख रुपये किमतीची सोन्याची गदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, स्पर्धेचे स्वागताध्यक्ष तथा आमदार प्रा. राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

गादी विभागात अंतिम लढतीत शिवराज राक्षे व माऊली कोकाटे यांच्यात झाली. अवघ्या तीनच मिनिटांत शिवराज राक्षेने 12-2 अशा गुणांनी ही कुस्ती जिंकली. माती विभागात अंतिम कुस्ती सिकंदर शेख व महेंद्र गायकवाड यांच्यात झाली. ही कुस्ती चांगलीच रंगली. सिकंदरने त्याला साजेशी कुस्ती करत एका गुणाने आघाडी मिळवली. ही आघाडी मध्यंतरापर्यंत होती. नंतर प्रशिक्षकाच्या सांगण्यावरून महेंद्र गायकवाडने संयमाने सिकंदरचा सामना केला. शेवटची काही मिनिटे बाकी असताना महेंद्र गायकवाडने आक्रमकता दाखवत 4-3 गुणांनी विजय मिळविला.

या कुस्तीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले होते. येथील वाडिया पार्क मैदानावर 21 ते 23 असे तीन दिवस छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. माती व गादी प्रकारात ही स्पर्धा रंगली. माती आणि गादी प्रकारातील अंतिम लढतींनंतर स्पर्धेतील विविध गटांतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कुस्ती प्रेमींनी हजेरी लावली.

Back to top button