नगर जिल्ह्यात लवकरच पशुविज्ञान केंद्र : पालकमंत्री विखे | पुढारी

नगर जिल्ह्यात लवकरच पशुविज्ञान केंद्र : पालकमंत्री विखे

नगर; पुढारी वृत्तसेवा : पशुधन विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने जिल्हास्तरावर पशुविज्ञान केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे आणि सावळीविहीर येथे पशुवैद्यकीय पदविका अभ्यासक्रमही सुरू करण्याचे सूतोवाच महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन विखे पाटील यांनी काही विभागाचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य शेळी-मेंढी पालन महामंडळ उभे राहणार असून, त्यासाठी दहा हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. शेळी-मेंढी पालन तसेच प्रक्रिया उद्योगासाठी महामंडळाच्या माध्यमातून पतपुरवठा केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महामंडळाचे मुख्यालय अहमदनगर येथील शासकीय दूध डेअरी कार्यालयात असेल असे सांगून येत्या 1 मे रोजी या महामंडळाचे उद्घाटन होणार असल्याचे विखे पाटील म्हणाले. विखे पाटील म्हणाले, की विदर्भात 11 जिल्ह्यांत 41 लाख लिटर दूध उत्पादन होते. मात्र, एकट्या अहमदनगर जिल्ह्यात 53 लाख लिटर उत्पादन होते. त्यामुळे विदर्भात आणखी व्याप्ती वाढविण्याचा विचार आहे. त्यासाठी विदर्भात पशुधन वाढवून दूध वितरण प्रणाली सक्षम करणार आहे.

के. के. रेंजप्रकरणी संरक्षणमंत्र्यांना भेटणार
संरक्षण विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सरावासाठी के. के. रेंज आहे. सरावासाठी आणखी जागा हवी असल्याची मागणी होत आहे. सध्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आले असून, साधनेही उपलब्ध झाली आहेत. सरावासाठी रणगाड्यांचा वापर होत आहे. त्यामुळे भूसंपादन करून जनतेला विस्थापित करण्याची गरज नसल्याचे मत महसूलमंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केले. याप्रकरणी संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या वज्रमुठीला तडे
महाविकास आघाडीची वज्रमूठ खिळखिळी होत आहे. त्यांच्यात एकमत राहिले नाही. प्रत्येक पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. विरोधी पक्षनेते अजित पवार-खा.संजय राऊत यांच्या तू तू -मै मै सुरु आहे. त्यामुळे वज्रमुठीला तडे गेल्याची टीकाही विखे पाटील यांनी केली. 2024 मध्ये जास्तीत जास्त जागा पटकावून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याची भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

Back to top button