नगर जिल्ह्यातील 34 विभागांच्या अधिकार्‍यांना लवकरच नोटिसा | पुढारी

नगर जिल्ह्यातील 34 विभागांच्या अधिकार्‍यांना लवकरच नोटिसा

नगर; पुढारी वृत्तसेवा : अनुकंपा उमेदवार भरतीबाबत आयोजित केलेल्या आढावा बैठकीस जिल्हाभरातील 34 विभागप्रमुख अनुपस्थित होते.या सर्व अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी दिले. आपल्या एकेकाळच्या सहकारी कर्मचार्‍यांच्या वारसांना नोकरीसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. याबाबत तुमची संवेदशीलता हरवली का, असा सवाल बैठकीत उपस्थित करीत जिल्हाधिकारी सालीमठ यांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी सालीमठ यांनी अनुकंपा उमेदवारांच्या भरतीसंदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी जिल्हाभरातील 52 शासकीय कार्यालयांच्या विभागप्रमुखांना आपापल्या कार्यालयातील एकूण रिक्त जागा आणि त्यामधील अनुकंपाच्या रिक्त जागा यांचा अहवाल घेऊन उपस्थित राहाण्याचे निर्देश दिले होते.

परंतु या बैठकीला पोलिस, सार्वजनिक बांधकाम, लेखा व कोषागार विभाग, समाजकल्याण, जिल्हा हिवताप, कृषी, जिल्हा उपनिबंधक,सहजिल्हा निबंधक, जिल्हा रुग्णालय, कौशल्य विकास रोजगार आदीसह 18 शासकीय विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ यांनी विभागनिहाय आढावा घेतला. किती जागा रिक्त आहेत. शासन धोरणानुसार किती अनुकंपाच्या जागा भरल्या. परंतु उपस्थितांकडून वेळकाढूपणाची उत्तरे मिळताच मुदृेसूद बोला.

माहिती नसेल तर बैठकीस उपस्थित का राहिलात. तुमचे विभागप्रमुख कुठे गेले. त्यांना या विषयाचे गांभीर्य नाही का, आपल्या एकेकाळच्या सहकारी कर्मचार्‍यांच्या वारसांची नियुक्ती करताना टाळाटाळ केली जात असल्याचे निदर्शनास येते. याबाबत तुमची सहनशीलता हरवली का, असे एकामागे एक प्रश्न उपस्थित करीत जिल्हाधिकारी सालीमठ यांनी अनुकंपाधारक उमेदवारांची भरती प्रक्रिया तत्काळ राबविण्याचे निर्देश दिले.

रिक्त जागांचा अहवाल सादर करा
प्रत्येक शासकीय विभागात वर्ग क आणि वर्ग ड प्रवर्गाच्या एकूण किती जागा मंजूर आहेत. त्यापैकी किती पदे रिक्त आहेत. यामध्ये अनुकंपासाठीच्या किती जागा रिक्त आहे. याचा अहवाल तत्काळ सादर करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सालीमठ यांनी विभागप्रमुखांना दिला आहे.

Back to top button