नगर : सिद्धटेक परिसराला वादळ, गारपिटीचा तडाखा | पुढारी

नगर : सिद्धटेक परिसराला वादळ, गारपिटीचा तडाखा

सिद्धटेक  : पुढारी वृत्तसेवा :  कर्जत तालुक्यातील सिद्धटेक, जलालपूर, दुधोडी, भांबोरा , बेर्डी, गणेशवाडी, बारडगाव या गावांना काल रात्री वादळ, अवकाळी वादळी पाऊस व गारांचा तडाखा बसला असून, शेतकर्‍यांच्या शेतपीक व फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्ण हतबल झाला आहे. काल रात्री आठच्या सुमारास अवकाशात काळे ढग दाटून आले. त्यानंतर परिसरात जोरदार वारे व धुळीचे लोट वाहू लागले.

त्यातच गारांचा पाऊस सुरू झाल्याने शेतकर्‍यांची मोठी धावपळ झाली. या वादळामुळे सिद्धटेक परिसरातील काही विजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे . तसेच अनेक ठिकाणचे डेरेदारे वृक्ष उन्मुळून पडले. डाळिंब व द्राक्ष फळबागामधील फुले, फळांची नासाडी होऊन आर्थिक नुकसान झाले आहे. आंब्यांची मोठ्या प्रमाणात गळती होऊन नासाडी झाली आहे. कांदा वखारीवरील झाकलेले कागद उडून गेल्याने कांदा भिजला आहे. काढणीला आलेला गहू, हरभरा भुईसपाट झाला आहे. शेतकर्‍यांच्या मागणीची महसूल विभागाने दखल घेऊन तलाठी मखरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकर्‍यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे केले.

Back to top button