नगर : व्हिडिओ क्लिपप्रकरणी काय कारवाई केली? | पुढारी

नगर : व्हिडिओ क्लिपप्रकरणी काय कारवाई केली?

नगर; पुढारी वृत्तसेवा : डी.एल.एड, टीईटी, तसेच जेसीसी परीक्षेचा उल्लेख असलेल्या व्हिडिओ क्लिपप्रकरणी नगरच्या संबंधित व्यक्तीवर चौकशीअंती कोणत्या प्रकारची कारवाई केली, असा सवाल युवाशाही संघटनेच्यावतीने अश्विनी कडू यांनी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना केला आहे. नगर जिल्ह्यातून डी.एल.एड, टीईटी परीक्षेसंदर्भात शिक्षण विभागाच्या एका अधिकार्‍याने केलेल्या सौेदेबाजीच्या व्हिडिओ क्लिपने राज्यात खळबळ उडवून दिली.

या क्लिपमध्ये अनेकांची नावे आहेत, त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीकडे राज्याचे लक्ष आहे. अनेक संघटनांनीही आवाज उठविला आहे. युवाशाही संघटनेच्यावतीनेही अश्विनी कडू व त्यांच्या सहकार्‍यांनी नुकतीच शिक्षण विभागाचे आयुक्त सुरज मांढरे यांच्यासह सचिव, राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांचे लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

आयुक्त सूरज मांढरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन नगरच्या व्हिडिओ क्लिपप्रकरणी सात दिवसांत अहवाल सादर करण्याच्या चौकशी समितीला सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार संबंधितावर कारवाई झाली की नाही, याविषयी माहिती द्यावी. तसेच संबंधित प्रकरण गंभीर असून, फौजदारी कारवाई करावी, अशी मागणीही अश्विनी कडू यांनी केली आहे. त्यामुळे आयुक्तांकडून संबंधित चौकशीत हलगर्जीपणा करणार्‍यांवर, तसेच व्हिडिओ क्लिपमधील दोषी अधिकार्‍यांवर काय कारवाई होणार, याकडे लक्ष आहे.

लेखनिकांची चौकशी व्हावी
शिक्षक भरती 2022-23 च्या भरती प्रक्रियेसाठी 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 या कालावधीत प्रत्येक दिवसाला दोन सत्रात परीक्षा घेण्यात आल्या. यातील दिव्यांग उमेदवारांना लेखनिक देण्यात आले होते. परीक्षेची काठिण्यपातळी लक्षात घेता या दिव्यांग उमेदवारांना मिळालेले गुण 150 वर असल्याने संशयास्पद आहे. त्यासाठी उमेदवारांना दिलेल्या प्रत्येक लेखनिकाची चौकशी करण्यात यावी, यासह इतरही काही उमेदवारांना 150 पेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत, त्यांच्याही चौकशीची मागणी अश्विनी कडू यांनी परीक्षा परिषदेकडे केली आहे.

आयुक्त मांढरे यांनी पत्राची दखल घेत तत्काळ चौकशीचे आदेश राज्य परिक्षा परिषदेला दिले आहेत. चौकशीनंतर कारवाई होईल, अशी अपेक्षा आहे. नाही झाली तर प्रसंगी आंदोलनाचा मार्गही अवलंबिला जाईल.

                         – अश्विनी कडू, संस्थापक अध्यक्ष, युवा शाही संघटना.

Back to top button