शेवगाव : बाजार समितीसाठी 85 उमेदवारी अर्जांची विक्री | पुढारी

शेवगाव : बाजार समितीसाठी 85 उमेदवारी अर्जांची विक्री

शेवगाव तालुका; पुढारी वृत्तसेवा : बाजार समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी 85 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 संचालक पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आज सोमवारी सुरूवात झाली. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही; मात्र 85 अर्जांची विक्री झाली आहे.

या दिवशी समितीचे माजी संचालक राजेंद्र ढमढेरे, अशोक नजन यांच्यासह मिलिंद गायकवाड, भाकपचे संजय नांगरे, काँग्रेसचे डॉ. अमोल फडके, राम अंधारे, भगुरचे सरपंच वैभव पुरनाळे आदींसह काही शेतकर्‍यांनी अर्ज घेतले आहेत. या निवडणुकीसाठी एका उमेदवारास एकच सूचक, अनुमोदक ग्राह्य धरले जाणार आहेत. एका उमेदवाराबरोबर दुसर्‍याही उमेदवारास एकच सूचक, अनुमोदक असल्यास यातून प्रथम दाखल झालेला अर्ज पात्र ठरेल, इतर अर्ज अपात्र होऊ शकतात. तर, बाजार समिती निवडणुकीत उमेदवारास प्रत्येकी एक लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे.

Back to top button