गौतमी पाटीलच्या एकेक अदाकारीने तरुणाई घायाळ | पुढारी

गौतमी पाटीलच्या एकेक अदाकारीने तरुणाई घायाळ

कोळपेवाडी; पुढारी वृत्तसेवा : आपल्या अदाकारीने सगळ्यांनाच घायाळ करणारी नृत्यांगना, जिच्या महाराष्ट्रभर होणार्‍या कार्यक्रमांना रसिकांची अलोट गर्दी होते, जिच्या हटके डान्सवर तरुणाई देहभान विसरून नाचायला लागते त्यावेळी तिचे कार्यक्रम थांबवावे लागतात किंवा आयोजकांना कार्यक्रम संपल्याचं जाहीर करावं लागतं त्या गौतमी पाटीलच्या मादक खाणाखुणांनी कोळपेवाडीत तरुणाईला घायाळ केले. निमित्त होते कोळपेवाडी व परिसराचे ग्रामदैवत श्रीमहेश्वर महाराजांची यात्रा अर्थात महेश्वर फेस्टिवलचे!

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे दरवर्षी ग्रामदैवत श्रीमहेश्वर महाराजांची यात्रा भरते. सलग तीन दिवस चालणार्‍या या यात्रेत दरवर्षी धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांसह मनोरंजनाचे कार्यक्रम यात्रा कमिटी व कोळपेवाडी ग्रामस्थ आयोजित करतात. यंदा यात्रा कमिटीने सोशल मीडियावर दबदबा असणार्‍या गौतमी पाटीलच्या लावण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता, मात्र महाराष्ट्रात ज्या पद्धतीने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाच्या स्टेजपुढे धुडगुस घालून कार्यक्रम बंद करण्याची नामुष्की आयोजकांवर आल्याच्या घटना घडल्या.

त्यामुळे कार्यक्रम कसा पार पाडणार, याबाबत यात्रा कमिटीमध्ये काहीशी साशंकता होती, परंतु यात्रा कमिटी व कोळपेवाडी ग्रामस्थांनी केलेल्या योग्य नियोजनातून व रसिकांनी कलेचा आदर करताना केलेल्या सहकार्यातून अडीच तास चाललेल्या या कार्यक्रमात प्रेक्षक गौतमी पाटीलच्या अदाकारीने घायाळ झाल्याचे दिसले. स्टेजलगत बैठक व्यवस्था केल्यामुळे महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला.

सेल्फी घेत महिलांचा आनंद द्विगुणीत केला..!
कार्यक्रमात काही महिला रसिकांच्या मोबाईलमध्ये गौतमी पाटीलने सेल्फी घेत त्यांचा आनंद द्विगुणीत केला. गौतमी पाटीलने आपल्या नृत्यात काही अंशी केलेला बदल रसिकांनी स्वीकारल्याचे कोळपेवाडीच्या महेश्वर फेस्टीवलच्या कार्यक्रमातून सिद्ध झाले.

Back to top button