संगमनेर : कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई : पोनि मथुरे | पुढारी

संगमनेर : कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई : पोनि मथुरे

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : श्रीराम नवमी व हनुमान जयंतीनिमित्त मिरवणूक काढून उत्सव शांततेत साजरा करा, मात्र कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, अशी तंबी शहर पो. नि. भगवान मथुरे यांनी दिली. श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस ठाण्यामध्ये शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी मथुरे बोलत होते. यावेळी शिव चरित्रकार एस. झेड देशमुख, भाजप शहराध्यक्ष श्रीराम गणपूले, शिरीष मुळे, किशोर पवार, कैलास वाक्चौरे, बजरंग दलाचे सचिन कानकाटे, विशाल वाक्चौरे, कुलदीप ठाकूर, अक्षय थोरात, उद्धव ठाकरे शिवसेनेचे पप्पू कानकाटे, अमित चव्हाण आदी उपस्थित होते.

श्रीराम नवमीनिमित्त गुरुवारी अभिनवनगर येथील श्रीराम मंदिरापासून शोभायात्रेस सुरुवात होईल. चंद्रशेखर चौकात मोठा मारुती मंदिर व श्रीराम मंदिर येथे महाआरती होवून शोभायात्रेची सांगता होणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव समितीच्या पदाधिकार्‍यांनी दिली.

तुम्ही मिरवणुका काढा. वेळेत पूर्ण करा. कायद्याचे उल्लंघन होणार नाही त्याची दक्षता घ्या, अशी सुचना मथुरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
श्रीराम नवमीनिमित्त शोभायात्रा सायंकाळी उशिराने निघते. त्यामुळे निवडणुकीला 12 वाजेपर्यंत परवानगी द्यावी, अशी मागणी बजरंग दल, श्रीराम नवमी हनुमान जयंती उत्सव समितीने पो. नि. मथुरे यांच्याकडे केली, मात्र आम्हाला कायद्याबाहेर जाता येत नाही. तुम्ही वेळेत मिरवणूक पूर्ण करा, असे मथुरे म्हणाले.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यास सुचवा..!
श्रीरामनवमी व हनुमान जयंतीच्या कालावधीमध्ये गो हत्या बंद करा, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यास पालिकेला सुचवावे, अशी मागणी बजरंग दल पदाधिकार्‍यांनी केली, असता या कालावधीमध्ये गोहत्या होणार नाही, याची दक्षता घेऊ, असे पो. नि. भगवान मथुरे म्हणाले.

Back to top button