पाथर्डी : शेतकर्‍यांचा वीजप्रश्न पंधरा दिवसांत सोडवू | पुढारी

पाथर्डी : शेतकर्‍यांचा वीजप्रश्न पंधरा दिवसांत सोडवू

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कृषिपंपांच्या समस्यांबाबत बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी महा वितरणच्या अधिकार्‍यांसमवेत पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची चर्चा घडवून आणली. चर्चेदरम्यान ग्रामीण भागातील विजेच्या तक्रारींचे निराकरण येत्या पंधरा दिवसांत करू. मात्र, त्यासाठी वीजबिल वसुलीला सहकार्य करण्याचे आवाहन बैठकीत महावितरणकडून करण्यात आले.

अ‍ॅड. ढाकणे यांच्या जनसंपर्क कार्यालयात ग्रामीण भागातील वाढत्या वीजकनेक्शन तोडी, तसेच कृषिपंपांच्या जोडणीसंदर्भात नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन ढाकणे यांनी प्रमुख ग्रामस्थ व पदाधिकार्‍यांना चर्चेला बोलावून ग्रामीण उपअभियंता संजय माळी यांच्यासमवेत बैठक घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, महारुद्र कीर्तने, ज्ञानदेव केळगंद्रे, विष्णूपंत पवार, रामराव चव्हाण, किरण खेडकर, उज्ज्वला शिरसाट, पांडुरंग शिरसाट, नवनाथ चव्हाण, बंडू पाटील बोरुडे, दिगंबर गाडे, वैभव दहिफळे, अनिल ढाकणे, डॉ राजेंद्र खेडकर, राजेंद्र नागरे, अतिश निर्‍हाळी, योगेश रासने, देवा पवार, अक्रम आतार, हुमायून आतार, अंबादास राऊत, वृद्धेश्वर कंठाळी, रोहित पुंड, शंकर बडे उपस्थित होते.

पूर्वकल्पना न देता वीज खंडित केली जाते, मुदत संपल्यानंतर वीजबिले दिली जातात, कृषिपंपांना रात्रीच्या वीजपुरवठ्याने शेतकर्‍यांना अडचणींचा सामना करावा लागतो. काही भागात वीजपुरवठ्यात दुजाभाव केला जातो. जळालेले रोहित्र बदलून मिळण्यास विलंब, अशा तक्रारींचा पाढा शेतकर्‍यांनी बैठकीत मांडला. यावर ढाकणे यांनी मध्यस्थी घडवत महावितरणच्या अधिकार्‍यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

तालुक्यात सव्वातीनशे कोटी रुपयांची विजेची थकबाकी आहे. एवढी थकबाकी असूनही कोणाचीही अडवणूक होऊ देत नाही. मात्र, पैशांशिवाय कोणताच कारभार चालत नाही. त्यामुळे प्रत्येक रोहित्रावरचे थकित वीजबिलांपैकी किमान वीस ते तीस टक्के रक्कम तातडीने भरून वीजपुरवठा सुरळीत करून घ्यावा. तक्रारींची दखल घेत पंधरा दिवसांत कृषिपंपांचा, तसेच गावांचा वीजपुरवठा सुरळीत प्रयत्न करू, असे आश्वासन उपअभियंता माळी यांनी दिले.

Back to top button